ठाणे : ठाण्यातील एका जिममध्ये व्यायाम करताना एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रतिक परदेशी (२८) असं मृत तरुणाचं नाव आहे. ठाण्यामधील दम्माणी इस्टेट येथील ‘गोल्ड जिम’मध्ये हा तरुण व्यायाम करत असताना अचानक कोसळला. त्याला जिममधील व्यक्तींनी रुग्णालयात तात्काळ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हार्टस्ट्रोकमुळे मृत्यू
महगिरी येथे प्रतिक परदेशी हा तरुण राहायचा. या तरुणाला जिमची आवड असल्यामुळे तो रोज गोल्ड जिममध्ये येऊन व्यायाम करत होता. काही कारणास्तव तो आठ ते दहा दिवस जिममध्ये आला नव्हता. १७ जानेवारी रोजी तो खूप दिवसांनी जिममध्ये येऊन व्यायाम करत होता. नेहमीप्रमाणे जिम करत असताना हा तरुण अचानक खाली कोसळला. त्याला त्वरीत डॉक्टरांकडे नेले पण तो वाचू शकला नाही. या तरुणाला मृत्यू हार्टस्ट्रोकमुळे आल्याचं सांगण्यात आलं आहे.