ठाण्यात रेतीबंदर येथे पादचारी पूल बांधणार

0

ठाणे । मुंब्रा रेतीबंदर येथील नागरिकांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावे लागत आहेत. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने रेल रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात संयुक्त बैठक घेऊन या ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात येणार असल्याचे आश्‍वासन मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिले आहे. या संदर्भातील लिखीत पत्र देण्यात येणार आहे. मात्र, आगामी दोन दिवसात लेखी पत्र न दिल्यास सोमवारी 13 नोव्हेंबर रोजी रेल रोको आंदोलन अटळ असल्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. मुंब्रा रेतीबंदर येथील बोगद्यानजीक मोठी लोकवस्ती आहे. या लोकवस्तीला मुख्य रस्त्यावर येण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्याने रेल्वे रूळ ओलांडावे लागत असतात. त्यामध्ये अनेकांना जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी आ. आव्हाड यांनी केली आहे.

रेल्वे पादचारी पुलाचे काम लवकरच सुरु होणार
सध्या या ठिकाणी दुतर्फा भिंत बांधण्यात येणार आहे. मात्र, स्थानिक नागरिकांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी मार्ग ठेवण्यात येणार नाही. त्यामुळेच आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशार्‍यानंतर जाग आलेल्या मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहामध्ये तातडीची बैठक घेतली. या बैठकीला आ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, मध्य रेल्वेचे अधिकारी रिझवान अहमद, अशोक सिंह, ठामपाचे कार्यकारी अभियंते धनंजय गोसावी, सुधीर गायकवाड आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मध्य रेल्वेचे अधिकारी रिझवान अहमद, अशोक सिंह यांनी या रेल्वे पादचारी पुलाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असून त्यासंदर्भातील पत्र आ. जितेंद्र आव्हाड यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.

अन्यथा आंदोलनाचा इशारा
आमदार आव्हाड यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून रेतीबंदर येथील रहिवाशांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडावे लागत आहेत. दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी पादचारी पुल बांधण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र, रेल्वे प्रशासन आपल्या आश्‍वासनावर ठाम नाही. मागील आठवड्यातच या ठिकाणी 4 जण जण मृत्यू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर जर रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलाचा निर्णय दोन दिवसात जाहीर केला नाही तर आम्ही सोमवारी रेल्वे अडवण्याचा निर्णयावर ठाम राहू.