ठाणे । राज्यात ऊसाच्या हमीभावासाठी आंदोलन सुरु झाले असतानाच ठाणे जिह्यातील भात उत्पादक शेतकर्यांनीही भाताला 4 हजार रुपये हमीभाव मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. उपोषणाला बसलेल्या शेतकर्यांनी, हे आंदोलन लाक्षणिक स्वरुपाचे असले तरी आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले. तर, या उपोषणाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघानेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिह्यांमध्ये भातशेतीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. मात्र, ऊस, कापूस, सोयाबिन या प्रमाणे भाताला हमी भाव दिला जात नाही.
आत्महत्या करण्याची वेळ
पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागातील शेतीसाठी जेवढी मेहनत लागत नाही. तेवढी मेहनत भातशेतीसाठी लागत असते. सुमारे 11 प्रकारची प्रक्रिया भातशेतीसाठी करावी लागत आहे. मात्र, त्यामानाने भाताला बाजारभाव दिला जात नाही. भातशेतीसाठी एकरी सुमारे 2 ते 2500 हजार रुपयांचा खर्च येत असतानाही केवळ 1700 रुपयांचा हमीभाव दिला जात आहे. त्यातच नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भाताची कापणी, भरडणी केली जात असतानाही भातखरेदी केंद्रे चक्क जानेवारीच्या दुसर्या आठवड्यामध्ये सुरु केली जात आहेत. त्यामुळे कोकण भातउत्पादक शेतकर्यांवरही आत्महत्येची वेळ येण्याची शक्यता येऊ शकते.
आंदोलन सुरूच ठेवणार
भात उत्पादकांना 4 हजार रुपये हमी भावा द्यावा; भात खरेदी केंद्रे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु करावी, अशी मागणी मुरबाड तालुक्यातील शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूराव यांनी केली आहे. तर, या उपोषणानंतर आमची मागणी मान्य झाली नाही तर हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असे सांगून नागपूर अधिवेशनादरम्यानही हमी भाव मिळेपर्यंत आमचे हे आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार आहे, असा इशाराही हिंदूराव यांनी यावेळी दिला.
यांनी दिला पाठिंबा
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, काँग्रेसचे ठाणे शहर सरचिटणीस सचिन शिंदे, भारिपचे शहराध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. भात उत्पादक शेतकर्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडण्यासंदर्भात आपण आपल्या पक्षाच्या आमदारांकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन यावेळी आनंद परांजपे यांनी दिले.