ठाणे: सालाबादप्रमाणे यंदाही बाळ गोपाळ मित्रमंडळ, नारळवाला चाळ, ठाणे च्यावतीने `हिंदूहृदयसम्राट अवयवदान दिव्यांग दहीहंडी महोत्सव-2017′ चे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, 8 ऑगस्ट रोजी शिवाजीमैदान, जांभळी नाका, मासुंदा तलाव, ठाणे येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सुप्रसिद्ध नेत्र शल्यविशारद तथा पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. तात्याराव लहाने, महापौर मिनाक्षी शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच ठाणे जिह्यातील मान्यवर डॉक्टर्सही उपस्थित राहणार आहेत. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सकाळी 11 वाजता दहीहंडीचे पूजन करून उत्सवास प्रारंभ होईल. या दहीहंडी महोत्सवाचे यंदाचे 26 वे वर्ष आहे. या उत्सवात ठाणे शहराबरोबरच अंबरनाथ, डोंबिवली, विक्रोळी, मालाड आदी ठिकाणच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या उत्सवाच्या वेळी अवयवदानाचे तसेच देहदानाचे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत.
दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण करण्याचा उद्देश
सदर उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारची थर लावण्याची स्पर्धा नसते. दिव्यांग मुलांच्या जीवनात जिद्द निर्माण व्हावी याकरिता तसेच अवयवदाना बद्दल जनजागृती व प्रसार व्हावा याकरिता दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात सहभागी सर्वच शाळांना समप्रमाणात रोख पारितोषिके व चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणारआहे. दहीहंडी उत्सवाबरोबरच सहभागी मुलांना वह्या वाटप, औषध(टॉनिक) वाटप करण्यात येणार आहे. तसेच सर्व शाळांना वृक्षांची रोपे भेट म्हणून देण्यात येणार आहेत.