पुणे । जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीची जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीस राज्य शासनाकडून 40 लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार असल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी दिली.
ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार शासनाने पर्यावरण संतुलित ग्राम योजनेचे रुपांतर करून स्मार्ट ग्राम योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 13 तालुक्यातील ग्रामपंचायतींनी स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक उर्जा आणि पर्यावरण व पारदर्शकता या निकषांच्या आधारे स्वमुल्यांकन करून प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानंतर गुणानुक्रमे प्रथम येणार्या ग्रामपंचायतींची निवड तालुका स्मार्ट ग्राम म्हणून करण्यात आली होती. तालुका स्मार्ट ग्रामपंचायती या जिल्हा स्तरावरील द्वितीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या. निवड झालेल्या तेरा तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींच्या पुनर्मुल्यांकनानंतर सर्वाधिक गुण प्राप्त ग्रामपंचायत जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडीची जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीस आता राज्य शासनाकडून 40 लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे.
13 तालुक्यांतून ठिकेकरवाडीची निवड
आंबेगाव तालुक्यातून गावडेवाडी, बारामती तालुक्यातून कटफळ, भोर तालुक्यातून केंजळ, दौंड तालुक्यातून गलांडवाडी, हवेली तालुक्यातून सांगरूण, इंदापूर तालुक्यातून गंगावळण, जुन्नर तालुक्यातून ठिकेकरवाडी, खेड तालुक्यातून आंबेठाण, मावळ तालुक्यातून वाकसई, मुळशी तालुक्यातून बावधन, पुरंदर तालुक्यातून धालेवाडी, शिरूर तालुक्यातून विठ्ठलवाडी, वेल्हा तालुक्यातून वेल्हे बुद्रूकची तालुका स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामधून ठिकेकरवाडीची जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात आली.