ठेकेदारांची बिले रोखून भाजप पदाधिकार्‍यांचा 20 कोटी लाटण्याचा डाव!

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेने 31 मार्चची मुदत संपल्याचे कारण देत कामे केलेल्या ठेकेदारांची 400 कोटींची बिले अडविली आहेत. ठेकेदारांनी सादर केलेली बिले खोटी आहेत. तुमची सर्वांची चौकशी करू, असे सांगून ही बिले अडविण्यात आली आहेत. भाजपच्या पदाधिकार्‍यांचा ठेकेदारांकडून 20 कोटी रुपये लाटण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोप स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान, शितोळे यांनी केलेल्या आरोपांमुळे ठेकेदारांच्या अडविलेल्या बिलांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये शीतयुद्ध रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महापालिकेला लुटण्याचे काम सुरू
प्रशांत शितोळे पुढे म्हणाले की, ‘ना भय, ना भ्रष्टाचार’ असा नारा देऊन भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता मिळविली. परंतु, भय दाखवून भाजपच्या पदाधिकार्‍यांकडून महापालिकेला लुटण्याचे काम सुरू आहे. सत्ता मिळताच अधिकारी, ठेकेदारांची पद्धतशीरपणे कोंडी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच शहरातील दोन्ही आमदारांच्या नावाने महापालिकेतील अधिकारी व ठेकेदारांना धमक्या दिल्या जात आहेत. जुन्या कामाची चौकशी करून; तुम्ही सादर केलेली बिले खोटी आहेत, अशी धमकी ठेकेदारांना दिली जात आहे. सुमारे 400 कोटी रुपयांची बिले थकली आहेत. ही बिले काढण्यासाठी 20 कोटी रुपयांची सौदेबाजी केली जाणार आहे, असे शितोळे यांनी सांगितले.

अन्यथा न्यायालयात जाऊ
महापालिका सार्वत्रिक निवडणकीमुळे आयुक्तांना अर्थसंकल्प सादर करण्यास उशीर झाला आहे. महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 95 नुसार अर्थसंकल्प 31 मार्चपूर्वी मंजूर होणे बंधनकारक आहे. तसे न झाल्यास आयुक्तांचा अर्थसंकल्प जैसे-थे मंजूर असल्याचे मानले जाते. तथापि, स्थायी समितीने आता त्यात फेरबदल करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळणार आहे. याचा विचार करता आयुक्तांनी सादर केलेला अर्थसंकल्प ’जैसे-थे’ मंजूर झाला पाहिजे. अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असा इशारा प्रशांत शिताळे यांनी दिला आहे.