ठेकेदारांची स्पर्धा टाळण्यासाठी उद्यान विभागाची हातचलाखी

0

वृक्षारोपणाची दीड कोटी निविदा

पिंपरी-चिंचवड : महापालिका उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाकडून शहरात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण करण्यात येते. त्या वृक्षारोपणाच्या निविदा प्रक्रियेत मोठी रोपे पुरविणे आणि लागवड करुन एक वर्षे देखभाल करण्याच्या कामात ठेकेदारांची स्पर्धा टाळण्यासाठी उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांनी हातचलाखी केली आहे. यामुळे ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदा राबविल्याचे दिसत आहे. दरम्यान, स्थायी समितीने कोणतीही चर्चा न वृक्षारोपण करण्यासाठी दीड कोटी रुपयांची रोपे खरेदी करणार आहेत. मोठी रोपे पुरविण्याचे काम मे. न्यू गार्डन गुरुज फार्म अ‍ॅन्ड नर्सरी या ठेकेदाराला देण्यात आले असून त्याला स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

60 रोप लागवडीचे उद्दिष्ट
वृक्षसंवर्धन विभागामार्फत यंदाही पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण केले जाणार आहे. महापालिकेने शहरात विविध ठिकाणी 60 हजार रोपे लावण्याचे उदिष्टे ठेवले आहे. त्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने, विविध मोकळ्या जागा, स्मशानभूमी, दफनभूमी, मैदाने, शाळा, पाण्याच्या टाकीच्या कडेने, धार्मिक ठिकाणी, मंडई, संरक्षण विभागाच्या जागा आदी ठिकाणी 12 हजार 303 रोपे, विकसित उद्याने, विकसनशील उद्याने 5 हजार 205, रेल्वेलाईनच्या कडेने मेट्रोमार्फत 4 हजार, मिलिटरी हद्दीमध्ये 30 हजार, रोपवाटिकेमधून विक्री व वाटप 6 हजार 492, हाऊसिंग सोसायटी 2 हजार अशी तब्बल 60 हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

अशी केली हातचलाखी
दरम्यान, उद्यान व वृक्ष संर्वधन विभागाने मोठी रोपे पुरविणे, लागवड करुन एक वर्षे देखभाल करणे कामे महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. यामध्ये मे. न्यू.गार्डन गुरुज फार्म अ‍ॅन्ड नर्सरी, मे.निसर्ग लण्डस्केप सर्व्हीसेस आणि मे. बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड या तीन निविदा महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी मे. न्यू.गार्डन गुरुज फार्म अ‍ॅन्ड नर्सरी यांची निविदा 3.50 टक्के अशी सर्वात कमी दराची भरली होती. त्या निविदेला स्वीकृत करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना मोठी रोपे पुरवून लागवड करुन एक वर्ष देखभाल करण्यासाठी 1 कोटी 36 लाख 90 हजार 162 रुपये देण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली. तसेच त्याच ठेकेदाराला दोन मीटर उंचीची रोपे खरेदी करण्यासाठी 31 लाख 42 हजार रुपये देण्यात येणार असून याबाबतच्या प्रस्तावाला देखील स्थायीने मान्यता दिली. त्यामुळे उद्यान विभागाच्या अधिका-याने संबंधित टेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून स्पर्धा टाळल्याचे दिसत आहे.