पुणे । महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना निकृष्ट साहित्य वाटप करणार्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असतानाच कारवाई टाळण्यासाठी संबंधित ठेकेदारांनी आता महापालिका आयुक्तांकडे धाव घेतली आहे. केवळ काहीच साहित्य निकृष्ट निघाले असून ते सर्व साहित्य बदलून देण्यात आले आहे, त्यामुळे प्रस्तावित कारवाई करण्यात येऊ नये असे विनंतीचे पत्र या ठेकेदारांनी आयुक्तांना दिले आहे.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘डायरेक्ट टू बेनिफिट’ (डीबीटी) योजनेर्तंगत जे शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेली दप्तरे आणि खोडरबर निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संबंधितांना काळ्या यादीत टाकण्यासाठी भांडार विभागाने कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे, यामध्ये कोंढवा खुर्द येथील सुपर पॉलिमर, विमाननगर येथील कॉस्मो ट्रेडर्स तसेच वडगाव बुद्रुक येथीक न्यू कोहिनूर आर्टस या दुकानदारांचा समावेश आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे घाबरलेल्या ठेकेदारांनी ही कारवाई टाळण्यासाठी थेट आयुक्तांकडे धाव घेतली आहे. आम्ही जे साहित्य वाटप केले, त्यामधील काहीच साहित्य निकृष्ट आढळून आले आहेत. ते साहित्य विद्यार्थ्यांना बदलून देण्यात आले आहे. त्यामुळे आता आमच्यावर कारवाई करू नये, अशी मागणी यासंबंधित ठेकेदारांनी आयुक्त कुणाल कुमार यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
लक्ष हटविण्यासाठी गणवेशाचा मुद्दा !
विद्यार्थ्यांना यावर्षी नवीन रंगाचे गणवेश वाटप करण्यात येणार आहे. या गणवेशांच्या वाटपासाठी 10 सप्टेंबरची मुदत आहे. अद्याप त्यांचे वाटपास सुरुवात झालेली नाही. मात्र असे असतानाही सत्ताधारी भाजपच्या एका नेत्यांकडून गणवेश निकृष्ट असल्याचा कांगावा केला जात आहे. केवळ निकृष्ट साहित्य पुरविणार्या ठेकेदारांना वाचविण्यासाठी आणि विषयाकडील लक्ष हटविण्यासाठी गणवेशाचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
दरम्यान ज्या ठेकेदारांना प्रशासनाने काळ्या यादीत टाकण्यासंबधीची नोटीस बजाविली आहे. त्यामध्ये ज्या संस्थेच्या नावाखाली निकृष्ट साहित्याचे वाटप झाले, त्या संस्थेला काळी यादीत टाकण्याऐवजी ठेकेदारांच्या अन्य संस्थेला काळ्या यादीत टाकले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत सांशकता निर्माण झाली आहे. तर दुसरेकडे या निकृष्ट साहित्य पुरविणार्या ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी भाजपच्या एका नेत्यांकडून सुरू आहे. त्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
जुने गणवेश निकृष्ट
महापालिकेच्या विद्यार्थ्यांना यापूर्वी जुने गणवेश वाटण्यात आले होते. ते निकृष्ट असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, मात्र विद्यार्थ्यांना यावर्षी नवीन गणवेश देण्यात येणार आहेत. नवीन गणवेशाचे वाटप सुरू आहे. मात्र ते निकृष्ट असल्यासंबधीच्या कोणत्याही तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या नाहीत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.