वरणगाव :- वरणगाव नगरपरीषदेचा मागील दैनिक भाजी बाजार वसुली मक्तेदार संजय भास्कर वानखेडे (भुसावळ) यांनी 2016-17 या आर्थिक वर्षाकरीता वसुलीचा लिलाव घेतला होता. मात्र त्यातील उर्वरीत रक्कम पालिकेकडे जमा न केल्याने वरणगाव नगरपालिका प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधिताविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाने कळवले आहे.
शिल्लक रक्कम ठेकेदाराने भरलीच नाही
संजय वानखेडे यांनी सन 2016-17 मध्ये वरणगाव दैनिक भाजीबाजार वसुलीचा लिलाव दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयात घेतला होता. त्यातील एक लाख 40 हजाराची रक्कम भरण्यात आली मात्र शिल्लक राहिलेल्या रकमेपैकी पालिकेला दिलेला 50 हजारांचा एचडीएफसी बँकेचा धनादेश वटला नाही व त्याचा अनादर झाल्याने संंबंधितास तोंडी व लेखी सुचना देवूनही त्यांनी लिलावाची रक्कम भरली नाही तसेच शासन व नगरपरीषदेची फसवणूक केल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांचे नाव नगरीपरीषदेच्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येणार असल्याचे नगर परीषदेने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.