ठेकेदाराचा ‘वर्षा’समोर आत्मदहनाचा इशारा

0

भीमसृष्टीच्या कामात महापालिका अधिकार्‍यांनी फसविल्याचा आरोप

पिंपरी-चिंचवड : महापालिकेकडून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी साकारण्यात येत आहे. संत नामदेव व संत ज्ञानेश्‍वर महाराज समुहशिल्पानंतर भीमसृष्टीच्या कामावरून वाद निर्माण झाला आहे. काम देण्यास डावललेल्या एका ठेकेदाराने महापालिकेच्या संबधित अधिकार्‍यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केलेले आहेत. तसेच, आपल्याला न्याय मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानासमोर आत्मदहनचा इशारा या ठेकेदाराने दिला आहे.

लेखाधिकारी जगदाळेंवर आक्षेप
सुभाष दादुराम आल्हाट (रा. विश्रांतवाडी) असे या ठेकेदाराचे नाव असून आल्हाट आर्ट स्टुडिओ ही त्याची संस्था आहे. या ठेकेदाराने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आळंदी रस्त्यावर वडमुखवाडी येथे संत नामदेव व संत ज्ञानेश्‍वरांचे समुहशिल्प उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम करण्यासाठी इच्छुक असताना ते काम दुसर्‍या ठेकेदाराला दिले गेले. त्यानंतर पिंपरीतील भीमसृष्टीचे काम मिळवून देण्याची ग्वाही महापालिकेतील लेखाधिकारी तानाजी जगदाळे यांनी दिली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे निविदाप्रक्रिया भरून व व्यवहार करूनही हे काम माझ्याऐवजी प्रतिस्पर्धी ठेकेदार मे. कलासंस्कार आर्ट स्टुडिओला देण्यात आले.

दहा लाखाची फसवणूक
हेतूपुरस्कर मला अंधारात ठेवून डावलून हे काम दुसर्‍याला दिले गेले. यात माझ्याकडून दहा लाख रुपये घेऊन मला फसविण्यात आले. माझे आर्थिक व सामाजिक नुकसान झाले आहे. याला जबाबदार अधिकारी व संबधितांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी मी वारंवार केली आहे. परंतु, काहीही होत नाही. मी एक मागासवर्गीय या व्यवस्थेचा बळी ठरलो आहे. त्याला कंटाळून येत्या 25 एप्रिल 2018 रोजी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करणार आहे, असा इशारा आल्हाट या ठेकेदाराने दिला आहे.