लोणावळा : दोन दिवसांपूर्वी ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे एक कर्मचार्याचा जीव गेला. या कर्मचार्याचा वीजेच्या खांबावर शॉक लागून खाली पडल्याने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर विद्युत काम करण्याचा अधिकृत परवाना नसताना कर्मचार्यांच्या जीवाशी खेळ करणार्या बोगस ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि मावळ तालुका वीज वितरण समिती सदस्य सुनील तावरे यांनी महावितरण कंपनीला दिले.
निवेदनामध्ये तावरे म्हणाले की, रविवारी तुंगार्ली परिसरात विजेच्या खांबावर काम करण्यासाठी चढलेल्या रफिक शेख या कर्मचार्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. विजेच्या तारेतून वाहणारा मुख्य प्रवाह बंद न करता शेख याला खांबावर चढण्यास सांगण्यात आले होते. ज्या ठेकेदाराकडून हे काम करण्यात येत होते, त्या ठेकेदाराकडे स्वतःचा परवाना नसून दुसर्याच्या परवान्याखाली तो काम करीत होता. सोबतच लाईन बंद करण्याची, बॉक्स मधील फ्यूज काढण्याची तसेच विजवाहक खांबावर चढण्याची परवानगी एका खाजगी कर्मचार्याला देण्यात आली होती का? याबद्दल महावितरण कंपनीने उत्तर दिले पाहिजे.