ठेकेदारावर गुन्हा दाखलसाठी विलंब

0

जळगाव । शहरातील स्वस्तिक गोडावून मध्ये 19 नोव्हेंबर 2014 मध्ये शालेय पोषण आहारात मुदतबाह्य धान्यांचा पुरवठा होत असल्याचे आढळून आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मुदतबाह्य धान्य साठा पकडला होता. याप्रकरणी पुरवठादारावर गुन्हा नोंदवावा असे स्थानिक गुन्हे शाखेने अडीच वर्षानंतर गटशिक्षणाधिकारी यांना पत्र दिले आहे. त्या पत्रानुसार सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी आणि पोषण आहार अधिक्षक यांना दिले. सीईओंच्या आदेशान्वये पंचायत समिती जळगाव गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी पोषण आहार अधिक्षक पदाचा कार्यभार असलेले रविंद्र बिर्‍हाडे यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी पत्र दिले. मात्र पोषण आहार अधिक्षकांकडून बुधवारी देखील गुन्हा नोंदविण्यात आलेला नसून अधिक्षक गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. पोषण आहार अधिक्षकांकडून टाळाटाळ होत असल्यांने त्यांच्यावरील संशय बळावत आहे.

2014 चे प्रकरण
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तांदुळ वाहतुक व धान्यादी मालाचा पुरवठा करण्याचे कंत्राट सन 2014-15 या वर्षाकरीता महाराष्ट्र स्टेट कन्झुमर्स फेडरेशन लि. मुंबई यांनी सालासार ट्रेडींग कंपनी पाळधी ता.धरणगाव यांना देण्यात आला होता. 19 नोव्हेंबर 2014 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा येथील विनोद राठी यांच्या मालकीच्या जळगाव येथील स्वस्तिक गोडावून येथे तपासणी केली. या ठिकाणी धान्याच्या मालाचा मुदतबाह्य पुरवठा आढळून आला होता.

पुरवठादाराची कबुली
गोडावून मालक विनोद राठी यांनी त्यांच्या लेखी जबाबात सदरचा मुदतबाह्य माल शालेय पोषण आहाराचा असल्याचे मान्य केले होते. त्यानुंषगाने पंचायत समितीने 30 नोव्हेंबर 2014 रोजी सालासर ट्रेडींग कंपनीचे भागीदार योगेश लढ्ढा व गोडावून मालक विनोद राठी यांच्या विरुध्द तक्रार दाखल करण्यात यावी असे पत्र स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. मात्र गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

माहिती अधिकारातून उघड
अडीच वर्षानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य जयपाल बोदडे यांनी माहितीच्या अधिकारात स्थानिक गुन्हे शाखेकडे 3 ऑगस्ट रोजी माहिती मागविली होती. तत्पूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने याबाबत 31 जुलै रोजी गटशिक्षणाधिकारी यांना एमआयडीसी पोलिसात तक्रार करण्याबाबत सुचविची माहिती दिली. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनंतर जिल्हा परिषदेला जाग आली असून गुन्हा नोंदविण्याबाबत हालचाली सुरु आहे. सोमवारी 28 रोजी माहिती मिळाल्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना टिपणी पाठवून गुन्हा नोंदविण्याबाबत मार्गदर्शन मागविले होते.

सीईओंच्या आदेशान्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोषण आहार अधिक्षकांविरुध्द फिर्याद दाखल करण्यासाठी पोषण आहार अधिक्षक वर्ग 2 चे कर्मचारी असलेले रविंद्र बिर्‍हाडे यांना पत्र दिले. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल करतो आणि त्यानंतर अहवाल सादर करण्याचे सांगितले. मात्र सायंकाळी 6.30 वाजेपर्यत त्यांनी अहवाल पाठविला नाही. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
गटशिक्षणाधिकारी- कल्पना चव्हाण