धुळे । शहराला जीवनदायी ठरणार्या 136 कोटी रुपयांच्या पाणी योजनेंतर्गत ठेकेदाराची मनमानी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी, कर्मचार्यांची सुस्ताई यामुळे वैतागलेल्या स्थायी समिती सभापती कैलास चौधरींसह नागरिकांनी सोमवारी देवपूरातील नवरंग पाण्याची टाकी येथे आंदोलन करीत ठेकेदारासह जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना कार्यालयात कोंडले. जोपर्यंत काम सुरु करण्याचे आणि ते पावसाळ्यापुर्वी पूर्ण करण्याबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार कैलास चौधरी यांनी व्यक्त केला आहे. गेले चार तास नागरीकांसह स्वतः कैलास चौधरी या ठिकाणी ठाण मांडून बसले होते.
प्रस्तावावर कुठलाही निर्णय नाही
शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी 136 कोटी रुपयांची पाणी योजना राबविली जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ठेकेदार ही योजना पूर्ण करीत आहे. देवपूरातील एकविरा देवी मंदीर परिसरातही हे काम होणार असून या भागातील जीर्ण झालेली एक पाईपलाईन बदलण्यासह ती पुढे एकविरादेवी भक्तनिवासापर्यंत लांबविण्याचा प्रस्ताव त्या प्रभागातील नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांनी दिला आहे. गेली सहा महिने या प्रस्तावावर कुठलाही निर्णय झाला नाही. उलट ठेकेदाराने यासाठी रस्त्यावर खोदून ठेवलेले खड्डे आणि काम सुरु नसतांना टाकलेली खडी याचा त्रास नागरिकांना होत आहे. या खडीमुळे दुचाकी वाहनधारकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून कालच एका तरुणाचा जीव थोडक्यात बचावला. खडीवरुन गाडी सरकल्याने अपघात होवून या तरुणाच्या जीवावर बेतले. या घटनेमुळे भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असल्यामुळे सभापती कैलास चौधरी यांनी सोमवारी सकाळी नवरंग पाण्याची टाकी गाठून तेथे असलेल्या ठेकदारासह जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना याबाबत जाब विचारला.
पाणी योजनेसाठी पाटणकरांचे बेमुदत उपोषण
शिंदखेडा तालुक्यातील मौजे पाटण येथे नविन पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, या मागणीसाठी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी दि 29 पासून धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरु केले आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिंदखेडा तालुक्यातील पाटण गावात प्रचंड पाणीटंचाई असून पाण्याचे स्त्रोत कोरडे झाले आहे. 35 वर्षांपूर्वी गावाशेजारी विहीर खोदून त्याद्वारे गावकर्यांना पाणीपुरवठा होत होता. मात्र आता ती विहीर कोरडी झाली आहे. परिसरात कुठलाही नविन पाण्याचा उगमस्त्रोत उपलब्ध नाही. शिवाय 35 वर्षात गावाची लोकसंख्या अनेक पटीने वाढली आहे. या गावात अनेक कुळांचे दैवत असलेल्या श्री आशापुरी देवीचे मंदीर असल्याने या ठिकाणी भाविकांसह व्यावसायीकांची नेहमीच गर्दी असते. या गावातील पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून दोन वर्षांपूर्वी धरणे आंदोलन करुन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे वारंवार पाठपुरावा करुनही पाणी योजना होत नसल्याने आमरण उपोषण करण्याची वेळ आली असल्याचे यात नमूद केले आहे. या आमरण उपोषणात सरपंच विशाल पवार, उपसरपंच श्रीमती ज्योत्सना सावंत, सदस्य सुभाष मालचे, पवन ठाकरे, दत्तात्रय पवार, भागवत परदेशी, श्रीमती रेणुबाई सोनवणे, श्रीमती मिराबाई जाधव, श्रीमती कविता पवार, श्रीमती धृपदाबाई मालचे, श्रीमती हेतल वाणी हे सहभागी झाले आहेत.
…तोपर्यंत दरवाजाबाहेर ठिय्या
निर्ढावलेल्या ठेकेदारासह अधिकार्यांकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने सभापती कैलास चौधरी यांनी या सर्वांना कार्यालयात कोंडून बाहेरुन दाराला कुलूप ठोकले आणि जोपर्यंत या प्रश्नाची तड लागत नाही तोपर्यंत दरवाजाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार जाहीर केला. सकाळी 9 वाजेपासून सभापती कैलास चौधरी यांचे हे आंदोलन सुरु असून दुपारी 1 वाजेपर्यंत कुठल्याही वरिष्ठाने त्याची दखल न घेतल्याने संताप व्यक्त होत होता. लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतांना अधिकारी निष्ठुर कसे? असा सवाल उपस्थित केला जात होता. कैलास चौधरी यांच्यासमवेत समिर काटे, हेमंत गुरव, वसंत मोरे, जाबीर शेख, प्रविण चौधरी, राजु चौधरी, जगन माळी, राजु चौधरी यांच्यासह नागरीक या आंदोलनात सहभागी झाले होते.