ठेलारी वाड्यांवर विकासाची पहाट अद्यापर्यत उगवलेलीच नाही

0

बळसाणे (अशोक गिरासे) । दुष्काळ, विज्ञान युगात जग चंद्रावर चालले आहे, परंतु साक्री तालुक्यातील माळमाथा भागातील ठेलारी वाड्यांवर विकासाची पहाट झालेलीच नाही. स्वातंत्र्यापासून मुलभूत सुविधा या वाड्यावस्त्यांवर पोहोचलेल्याच नाही. एकूणच जग चालते चंद्रावर माळमाथा भागातील ठेलारी मात्र आपली गाव , घरादार सोडून परजिल्ह्यात शेतातल्या मोकळ्या जंगलात मेंढ्या सोडून प्लास्टिकच्या सह्याने तंबू गाडून भर थंडीत लेकरबाळांसह परिवारातील वयोवृद्ध व पाळीव प्राणी थंडीत कुडकुडत असल्याचे चित्र दिसत आहे. कसला विकास, विकास म्हणजे काय असा प्रश्‍न ठेलारी वाड्याला पडतो. धुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ठेलारी बांधवांच्या वाड्या, वस्त्या आहेत आणि बळसाणे गावापासून काही अंतरावर आगरवाडा नावाचे गाव वसले आहे. या वाड्यांवरच्या नागरिकांच्या पाचवीला पुजलेल, दारिद्रय, भाकरी आणि भविष्याच्या शोधाकरिता करावी लागणारी भटकंती अशा खडतर परिस्थितीतून माळमाथा परिसरातील ठेलारी समाज वाटचाल करीत आहेत.

जोडधंदा नाही
आगरपाड्यात महामंडळाची बसेस जात नाही. ठेलारी समाजांचे वाडे तालुक्यापासून काही अंतरावर असल्याने शासनाच्या मुलभूत सुविधा मिळत नाही. ठेलारी बांधवांच्या विकासासाठी शासनाने पुढाकार घेतला तर ठेलारी बांधवांचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मेंढी पालन व्यतिरिक्त दुसरा जोडधंदा नसल्याने मेंढ्यांना घेऊन घरदार सोडून परजिल्ह्यात उदरनिर्वाहासाठी स्थलांतरीत व्हावे लागत आहे.

पाण्याची सोय नाही
मेंढ्यांच्या शेणखताच्या विक्रीने कुटुंबाचा गाडा चालविला जातो हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच कुटूंबांकडे शेती आहे. ज्याच्याकडे शेती आहे त्यांना पाण्याची सोय नाही. संपूर्ण शेती निसर्गावरच अवलंबून आहे. ठेलारी बांधवांचे कुटुंब जंगलात असल्याने रात्री अपरात्री तब्येतीच्या समस्या उदभवल्यास रुग्णालयात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. माळमाथा परिसरात रोजगाराचे साधन नसल्याने तरुणांनाही पोटाची खळगी भरण्यासाठी पारंपारीक मेंढी पालन करावी लागत आहे.

शिक्षणापासून कोसो दूर
समाजातील तळागाळातील जनतेला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहे. पारंपारीक शिक्षणाला डिजीटल शिक्षणाची जोड शासन देत आहे. मात्र ठेलारी वाड्यातील मुलं शिक्षणापासून वंचीत आहे. शिक्षण प्रणालीपासून ते कोसो दुर आहे. शिक्षणापासून वंचीत असलेल्या या वस्तीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.