ठेवीदारांच्या तक्रारींबाबत सहकार विभाग उदासीन

0

भुसावळ। कष्टाने पै पै जमा करून पतसंस्थांमध्ये ठेवीस्वरूप गुंतवणूक केलेल्या रकमांबाबत मुदत पूर्ण झाल्यानंतरही भ्रष्ट पतसंस्थाचालक रकमा परत करत नसल्याने ठेवीदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे शिवाय पतसंस्था चालकांवर नियंत्रण ठेवून असलेला सहकार विभागही मूग गिळून गप्प असल्याने शहरातील ठेवीदार आक्रमक झाले आहेत. 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात येत असलेल्या पालकमंत्र्यांकडे या बाबींची कैफियत मांडणार असल्याची माहिती ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील यांनी दिली.

लोकशाहीदिनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेण्याची मागणी
मंगळवारी त्यांच्या नेतृत्वाखालील ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली. लोकशाही दिनासह महिला दिन तसेच जिल्हास्तरीय लोकशाही दिन, महिला लोकशाही दिनासह तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर अद्यापही दखल घेतली गेली नसल्याने दखल घ्यावी, अशी मागणी ठेवीदारांनी प्रसंगी केली. महिला ठेवीदार कृती समितीच्या संध्या चित्ते, बळीराम फिरके, प्रेमनारायण मौर्य, धनराज बेंडाळे, प्रभूदिनी बेंडाळे, वैशाली नेहेते, योगीता घोराडे, रंजना पाटील, चित्रकला फेगडे, स्वाती फेगडे, भारती राणे, विजया चौधरी यांच्यासह अन्य ठेवीदारांची उपस्थिती होती.