जळगाव – भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या निमीत्ताने ठेवीदारांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. या पतसंस्थेच्या ठेवीदारांसाठी चक्क राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आवाज उठविला आहे. विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही ठेवीदारांच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. मात्र ठेवीदारांचा प्रश्न काही आजचा नाही. तो जुनाच आहे. सत्ताकाळ भोगलेल्या अनेकांनी त्यांच्या काळात ठेवीदारांना न्याय का मिळवुन दिला नाही? मग ठेवीदारांविषयीचा पुळका आत्ताच का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. ”
जिल्ह्यात गेल्या 12 वर्षापूर्वी संचालकांच्या मनमानी कारभारामुळे पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. त्यात तापी सहकारी पतसंस्था, चंद्रकांत हरी बढे, काळा हनुमान सहकारी, भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था, पुर्णवाद नागरी सहकारी, फैजपूर अर्बन को-ऑप सोसायटी, अशा अनेक मोठ्या संस्था डबघाईस आल्याने हजारो ठेवीदारांचा कष्टाचा पैसा अडकला. हा पैसा परत मिळवुन देण्यासाठी ठेवीदारांच्या संघटनांचे त्या काळात पेवच फुटले होते. काही संघटनांच्या स्वयंघोषित नेत्यांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले होते. तर काहिंनी प्रसिध्दी मिळविण्यासाठीही ठेवीदारांचा वापर करून घेतला. जिल्ह्यातील अनेक पिडीत ठेवीदार आज हयात नाहीत. मात्र त्यांच्या नावाने आजही राजकारण करणार्यांची संख्या पुन्हा वाढु लागली आहे.
ठेवीदारांच्या खांद्यावर पुन्हा बंदूक
जळगाव जिल्हा हा राजकीय दृष्ट्या संवेदनशिल मानला जातो. या जिल्ह्यात राजकीय उट्टे किंवा बदला घेण्यासाठी अनेकांचा वापर केला गेला आहे. आता ठेवीदारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकीय सूड उगवण्याचा प्रकार समोर येत आहे. ठेवीदारांविषयीचा कळवळा दाखवून त्यांना न्याय मिळवुन देण्याची मागणी केली जात आहे. नुकतेच राष्ट्रवादीवासी झालेले एकनाथराव खडसे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही ठेवीदारांसाठी असाच कळवळा दाखवला आहे. बीएचआरच्या निमीत्ताने एकनाथराव खडसे यांनी ठेवीदारांना न्याय मिळवुन देण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी 2018 पासून पाठपुरावा केल्याचे सांगितले आहे. पण ज्यावेळी खडसे पालकमंत्री होते तेव्हा ठेवीदारांनी त्यांच्या व्यथा खडसेंकडे मांडल्या होत्या. तेव्हा खडसेंनी ‘ठेवी मला विचारून ठेवल्या होत्या का?’ असा प्रश्न करून त्यांची थट्टाच केली होती. थट्टा करणारे आता न्याय मिळवुन देण्याची मागणी कशी काय करू लागले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खडसेंप्रमाणे गुलाबराव पाटलांकडूनही निराशा
खडसे यांच्याप्रमाणे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सन 2016 मध्ये सहकार राज्यमंत्री असतांना ‘सहा महिन्यात ठेवीदारांना न्याय न मिळाल्यास फटके मारा’ असे विधान केले होते. त्यांच्या काळात अॅक्शन प्लॅनही तयार करण्यावर चर्चा झाली होती. मात्र वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष उलटले तरी अॅक्शन प्लॅन काही तयार झाला नाही आणि ठेवीदारांना काही न्याय मिळाला नाही. कुणीतरी आवाज उठवतो म्हणून ठेवीदार आजही आशेपोटी त्यांच्याकडे जातात. मात्र या आवाज उठविण्यामागे नेमके काय राजकारण आहे? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. कुठलेही राजकारण न करता बीएचआर प्रमाणे इतरही संस्थांची चौकशी होऊन ठेवीदारांचा त्यांच्या हक्काचा पैसा यंत्रणांनी परत मिळवुन द्यावा हीच अपेक्षा ठेवीदारांची आहे.