ठेवीप्रश्‍नी मंगळवारी मुखवटा मोर्चा

0

जळगाव। राज्याचे सहकार राज्यमंत्री व सहकार आयुक्त यांनी कठोर निर्देश देवून 2017 अखेर ठेवींचा निपटारा करण्याचा कृती कार्यक्रम ठरवून दिल्यानंतरसुध्दा जिल्ह्यातील सहकार खात्याकडून कर्ज वसूली व या संबंधी परिणामकारक पाठपुरावा केला जात नसल्याने शिघ्र अंमलबजावणी होणेसाठी जनसंग्राम संघटनेच्यावतीने मंगळवार 1 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयावर मुखवटा मोर्चा काढण्यात येणार आहे.

सहकार विभागाच्या खोट्या मुखवट्याचा निषेध
राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या विशेष उपस्थितीत ठेवीप्रश्‍नी तात्काळ उपाययोजना करुन ठेवी परत करणेसाठी वर्षभराचा कृती कार्यक्रम ठरविण्यात आला त्यात कालबध्द व टप्प्याटप्प्याने कर्ज वसूली व इतर उपाययोजनांची पाहिजे तशी अंमलबजावणी जिल्ह्यातील सहकार विभागाकडून होत नसल्याने गेल्या 7/8 महिन्यात एकाही ठेवीदाराला ठेवींचे पैसे परत देण्यात आलेले नाही. सहकार विभागाने धारण केलेला खोटा मुखवटा तात्काळ बाजूला सारुन ठेवीदारांच्या हितासाठी कर्ज वसूलीची कठोर उपाय योजना राबवावी हा संदेश देण्यासाठी ठेवीदार स्वतः मुखवटे धारण करुन जिल्हा उपनिबंधक यांना ठेवीप्रश्‍नी शिघ्र अंमलबजावणी होवून ठरल्याप्रमाणे कृती कार्यक्रम राबविण्याची मागणी करणार आहेत. जिल्हाभरातील सर्वच ठेवीदारांनी मुखवटा मोर्चास सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विवेक ठाकरे, डी.टी.नेटके, यशवंत गाजरे, भास्कर चौधरी, दीपक मांडोळे, मिलींद तायडे, किरण वाघ आदींनी केले आहे.