डीएसके आर्थिक संकट प्रकरण
पुणे : ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आल्याने फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले दीपक सखाराम कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीनअर्जावर गुरुवारी (दि.23) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावणीदरम्यान ठेवीदारांचे पैसे परत करण्याबाबत ठोस प्लॅन सादर केला जाईल, अशी माहिती डीएसकेंच्यावतीने देण्यात आली आहे. ठेवीदारांचे पैसे कसे परत करणार, याबाबत ठोस नियोजन सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी डीएसकेंना दिले होते. त्यानुसार डीएसकेंच्यावतीने न्यायालयापुढे सादर करण्याचा आर्थिक प्लॅन तयार करण्यात आलेला आहे.
न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
फसवणूकप्रकरणी डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांत अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी या दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. त्यांच्या अर्जावर यापूर्वी दोनवेळा सुनावणी झाली असून, 23 नोव्हेंबरपर्यंत त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. हा जामीन मंजूर करतानाच डीएसके डेव्हलपर्स लि.ने ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याबाबत आपले नियोजन सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार गुरुवारच्या सुनावणीवेळी अशाप्रकारचे नियोजन डीएसके सादर करणार आहेत. परवा झालेल्या पत्रकार परिषदेत डीएसके यांनी सहपरिवार उपस्थिती दर्शवून ठेवीदारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले होते, की डीएसकेंकडे नऊ हजार कोटी रुपयांची मालमत्ता असून, फिक्स डिपॉझिटसह जवळपास दीड हजार कोटी रुपयांची देणी द्यावयाची आहे. गेल्या 50 वर्षांपासून व्यवसाय करत आहोत. तर गेल्या 36 वर्षांपासून आपण ठेवी स्वीकारत आहोत. त्यापोटी व्याज व मुद्दल अशी सर्व रक्कम वेळोवेळी ठेवीदारांना परत करण्यात आलेली आहे. त्यामुळे आतादेखील सर्वांची देणी चुकती केली जाईल. ती कशी देण्यात येतील, याचा सविस्तर प्लॅन आपण गुरुवारी न्यायालयात सादर करणार आहोत, असेही डीएसकेंनी यावेळी सांगितले होते.
ड्रीम सिटीत विदेशी गुंतवणूक होणार!
बहुचर्चित ड्रीम सिटी प्रोजेक्टमध्ये विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास तयार असून, 13 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्पही पूर्णत्वास जाईल, असा विश्वास डीएसकेंनी कालच्या पत्रकार परिषदेत पत्नी हेमंती व मुलगा शिरीष यांच्या उपस्थितीत व्यक्त केला होता. हे तात्पुरते आर्थिक संकट असून, त्यातून आपण लवकरच बाहेर पडू, असेही ते म्हणाले होते. केंद्र सरकारने अचानक केलेल्या नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदाच होईल, असे सांगून त्यांनी आपल्यावर कोसळलेले संकट हे नोटाबंदीचे फलित नाही; त्याला इतरही अनेक घटक कारणीभूत आहेत, असेही डीएसकेंनी स्पष्ट केले होते. बांधकाम प्रकल्पांसह टोयोटो डीलरशीपचे कामही लवकच सुरु होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केलेला आहे. दरम्यान, गुरुवारी होणार्या सुनावणीकडे ठेवीदारांसह पुणेकरांचेही लक्ष लागलेले असून, कुलकर्णी दाम्पत्याला नियमित जामीन मिळेल की नाही, याबाबत शहरात चर्चा सुरु होती.