ठेवी परत न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा

0

महिला ठेवीदारांचे प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण

भुसावळ- गंभीर आजारी ठेवीदार व मृत ठेवीदारांच्या वारसांना त्यांच्या हक्काच्या ठेवी परत कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा महिला ठेवीदार कृती समितीतर्फे गुरूवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात आले. ठेवी परत न मिळाल्यास आगामी काळात आत्मदहन करण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला. कृती समितीच्या अध्यक्षा संध्या चित्ते, प्रविणसिंग पाटील यांच्यासह अन्य सभासद उपोषणात सहभागी झाले.

पतसंस्थेत वसुलीनंतर ठेवीदार कोरडेच
पतसंस्था चालकांकडून मोठ्या प्रमाणावर वसुली होत असूनही ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत केल्या जात नाहीत. सहकार विभाग या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांचे आदेश न मानणार्‍या पतसंस्था चालकांविरोधात कारवाई केली जावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. लोकशाही दिनात सातत्याने तक्रार मांडणार्‍या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळविण्यासाठी शासनाने परत मिळवून द्याव्या. काळा हनुमान, जय मातादी, संतोषी माता, विठ्ठल रखूमाई पतसंस्था, स्वामी समर्थ, सप्तश्रृंगी, स्वामी नारायण, मंगल शारदा, चक्रधर, जय श्रीराम, सद्गुरू कृपा, जनता अर्बन, मारोती अर्बन, आनंद अर्बन, तापी चोपडा, चंद्रकांत बढे, महेश मर्चंट, तापी अर्बन, इतर अन्य संस्थाची कर्जवसुली होत आहे. त्यामुळे ठेवी परत मिळाव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.