डंपरच्या धडकेत किनगावातील मुलाचा मृत्यू
अपघाताने हळहळ : पंढरपूरहून विठ्ठल दर्शनानंतर परतत असताना गाठले मृत्यूने : पहाटेच्या सुमारास धामणगाव फाट्याजवळ अपघात
यावल : भरधाव डंपरने प्रवासी वाहतूक करणार्या अॅपे रीक्षाला जोरदार धडक दिल्याने या अपघातात किनगाव येथील 17 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 5 ते 5.30 वाजेच्या सुमारास धामणगाव फाट्याजवळ घडली. या अपघातात तेजस प्रकाश तायडे (17, रा.किनगाव) या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला तर रीक्षातील अन्य प्रवासी जखमी झाले.
विठ्ठल दर्शनातून परतताना गाठले मृत्यूने
तेजस हा किनगावात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. गेल्या काही दिवसांपासून तो पंढरपूर येथे गेला होता. पंढरपूरहून परल्यानंतर तो मंगळवारी, 12 जुलै रोजी सकाळी जळगाव येथून घरी किनगाव येथे येण्यासाठी अॅपे रीक्षाने बसला. चोपडा तालुक्यातील धामणगाव फाट्याजवळ पेट्रोल पंपासमोरून प्रवाशी रीक्षा जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणार्या अज्ञात डंपरने प्रवासी अॅपेला जोरदार धडक दिली. या अपघातात तेजस तायडे हा जागीच ठार आला तर इतर प्रवासीदेखील जखमी झाले. त्यांची नावे अद्याप कळू शकली नाहीत. मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या अपघाताने किनगावात हळहळ व्यक्त करण्यात आली.