‘डब्बा’शेअरमध्ये पैसे गुंतवणार्‍यांची आयकर विभागाकडून होणार चौकशी

0

मोठा प्रमाणावर काळा पैशांचा वापर ; जिल्ह्याबाहेरच्याही गुंतवणुकदारांचीही मोठी संख्या

जळगाव – शहरात गणेश कॉलनी व जयकिसनवाडी परिसरात दोन ठिकाणी पोलीस उपअधीक्षकांनी छापा टाकून गेल्या काही वर्षापासून सुरु असलेल्या शेअर मार्केटमध्ये अवैध समजल्या डब्बा मार्केटचा पर्दाफाश केला. याप्रकरणात काळा पैसा गुंतवणार्‍यांची मोठी संख्या असून यात जळगाव जिल्ह्यातील शहरांसह बाहेरील जिल्ह्यातीलही गुंतवणुकदारांची संख्या आहे. व अनेक पैशांपासून हा काळाबाजार सुरु असल्याने अनेकांनी यात मोठ्या प्रमाणावर माया जमवली असून यातील संशययितांसह मार्केटमधील गुंतवणूक करणार्‍या अशा सर्वांच्या मालमत्ताची चौकशी करा, असा पत्रव्यवहार पोलीस विभागातर्फे आयकर विभागाकडे करण्यात आला असल्याची माहिती डॉ. निलाभ रोहन यांची बोलतांना दिली.

जामीनपात्र गुन्हा असल्याने सर्वांना नोटीस देवून सोडले
येथील जयकिसनवाडी तसेच गणेश कॉलनी परिसरात दोन ठिकाणी सहायक पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. यात जयकिसनवाडी येथील कारवाईत चेतन छाजेड (समित्रा कॉलनी), राहुल पाटील (खोटेनगर), उमेश राठोड या तिघांसह लॅपटॉप, मोबाईल, संगणक तसेच दुचाकी असा एकूण 02 लाख 16 हजार 900 रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. तर गणेश कॉलनीतील राजनंदिनी हाइट्स या अपार्टमेंटमध्ये तिसर्‍या मजल्यावर छापा मारला असता त्या ठिकाणी जयेश रजनिकांत जीवराजानी (वय 49, रा. राजनंदिनी हाइट्स), दर्शन जवाहरलाल जानी (वय 35, रा. गणेशा गार्डन, रिंगरोड), उदय श्रीनिवास क्षीरसागर (वय 33, राजनंदिनी हाइट्स), मनीष बाबूराव वांझट (वय 34, रायसोनीनगर), दीपक दिलीप अहिरे (वय 26, रा. समतानगर) व भगवान माणिक चव्हाण (वय 33, मेहरूण) हे सहा जण आढळून आले. या सहा जणांकडून 1 लाख 76 हजार 900 रुपयांची रोकड व साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान जामीनपात्र गुन्हा असल्याने सर्वांना नोटीस देवून जागेवरच सोडण्यात आल्याचेही यावेळी डॉ. रोहन यांनी सांगितले. दरम्यान जयकिसनवाडीत कारवाई ताब्यात घेतलेल्या चेतन छाजेड याला काही दिवसांपूर्वी मारहाण झाली होती. त्याचवेळी याच डब्बा शेअर मार्केटच्या पैशांच्या वादातून ती मारहाण झाल्याचीही माहिती मिळाली होती.

एक-एक करत जिल्ह्याबाहेरील गुंतवणूकदार जमविले
दिल्ली, मुंबईसह मेट्रो शहरांमध्ये अशाप्रकार अवैध पध्दतीने शेअर मार्केटचा प्रकार घडत असतो. मात्र जिल्ह्यात जळगाव शहरामध्येच सहजच काळा पैसा गुंतवणूक बदल्यात मोठ्या प्रमाणावर पैसाही मिळत असल्याने मोठ्या शहरांमध्ये गुंतवणूक करणारे साहजीकच मोठ्या संख्येने जळगावकडे आकर्षित झाले. एकदा संपर्क झाल्यावर अनेक वर्षापर्यंत तो याठिकाणचा गुंतवणूकदार झाला. अशाप्रकारे एक एक करत असे बुलढाणा, अमरावतीसह अनेक जिल्ह्यांमधील अनेक जण जळगावकडे आकर्षित झाले. व याचाच संशयितांनी फायदा उचलत त्यांना कायमचे ग्राहक बनवून टाकल्याचेही तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी कारवाई झाली त्यावेळी पोलिसांनी जप्त केलेल्या फोनवर अनेकांचे फोन येत असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे जळगाव शहरांमध्ये हा प्रकार होत असेल याबाबत किंचीतही एवढ्या वर्षात कुणाला शंका आली नाही.

आठवडाभरात एकदाच नफ्या-तोटा बघून व्यवहार
अवैध शेअरमार्केटमध्ये आधी डिपॉझिट म्हणून काही रक्कम गुुंतवूणक करणार्‍या ग्राहकांकडून घेतली जात होती. यानंतर शेअरमार्केट जसे वाढेल किंवा कमी त्याप्रमाणे हिशोब केला जात होता. अशाप्रकारे आठवड्यातील शेअर मार्केटच्या चढाओढ तसेच निच्चांकीप्रमाणे तोटा व नफ्याचा हिशोब संशयितांकडून केला जात होता. व त्याप्रमाणे गुंतवणूक करणार्‍यांना पैसा दिला जात होता. त्यामुळे संशयितांसह गुंतवणूक करणार्‍यांहीही याप्रकारातून मोठ्याप्रमाणावर काळा पैसा जमविला असल्याचीही माहिती मिळाली आहे. तसेच जयकिसनवाडीतील संशयित हा प्रकार बंद करणार होते, मात्र गुंतवणूकदारांचे बाकी असलेले पैसे देणे असल्याने आणखी काही पैसे जमवून मग ते हा प्रकार बंद करणार असल्याचेही चौकशीत संशयितांनी सांगितल्याचीही माहिती मिळाली आहे.