नवी दिल्ली – जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत भारताकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची जागतिक स्तरावर स्तुती होती आहे. त्यातच भारतासाठी एक मानाची आणि महत्त्वाची बाब समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेतील मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २२ मे पासून ते पदभार सांभाळणार असल्याचं अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे.
डॉ. हर्षवर्धन हे जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांची जागा घेणार आहेत. सध्या डॉ. नकतानी हे या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी एकमत झालं. १९४ देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षर्याही केल्या असं एका अधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर भारतीची नियुक्ती केली जाईल असा निर्णय मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया समुहाने सर्वांच्या संमतीने घेतला होता. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिले आहे.