एमआयडीसी पोलिसांची कामगिरी ; दोन्ही चोरट्या भावासह एक अल्पवयीन ताब्यात ; चोरलेली बुलेट राजस्थानमधील साथीदाराकडे
जळगाव- एमआयडीसी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून स्पोर्टस् व महागड्या दुचाकींच्या हौशेखातर दुचाकी चोरणार्या तरूणांच्या टोळीचा गुरूवारी रात्री पर्दाफाश केला़ यात एमआयडीसी पोलिसांनी किसन गजराम यादव वय 21 व शुभम गजराम यादव (रा़ महाजननगर, रामेश्वर कॉलनी) या दोन्ही भावांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे़ दुचाकीची चोरी केल्यावर तिचे पार्टची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. या तिघांनी दोन महिन्यांपूर्वी चोरलेल्या दुचाकीचे पार्ट-पार्ट पोलिसांना काढून दिले आहे़ दरम्यान एमआयडीसी परिसरातून चोरलेली बुलेट राजस्थानमधील साथीदाराकडे असल्याची माहिती संशयितांनी चौकशीत दिली असून पोलीस राजस्थानमध्ये जाणार आहेत.
सिंधी कॉलनी परिसरातून बुलेटची चोरी
सिंधी कॉलनी परिसरातून बाबा नगर येथून हर्षल दिलीपकुमार नागपाल या तरुणाची घरासमोर लावलेली 95 हजार रुपये किमतीची बुलेट चोरी झाल्याची घटना 16 मार्च रोजी समोर आली होती. याप्रकरणी दुसर्याच दिवशी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
डबी ग्राहक पाठवून चोरट्यांची खात्री
एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी विजय पाटील मनोज सुरवाडे यांना गुरूवारी रात्री काही तरूण दुचाकीचे पार्ट विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली़ त्यांनी लागलीच एक डमी ग्राहक तयार करून त्या तरूणांकडे पार्टस् खरेदी करण्यासाठी पाठविला़ तरूण दुचाकी चोरच असल्याची खात्री झाल्यावर आले होते. पाटील व सुरवाडे यांच्यासह सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील यांनी रात्रीच एमआयडीसी हद्दीतून त्या तरूणांना सापळा रचून अटक केली़ कसून चौकशी केल्यानंतर किसन यादव व शुभम यादव असे नाव सांगितले तर त्यांचा साथीदार अल्पवयीन युवकासही ताब्यात घेतले़
संशयितांकडून गाडीचे स्पेअरपार्ट जप्त
संशयितांकडून पोलिसांनी शॉकअप, पेट्रोल टाकी, लेट लॅम्प, प्रोजेक्टर लाईटस्, मिटर, हँडल बार, फ्रंट व्हिल, बॅक व्हिल, पेट्रोल पंप, लोअर पंप, अप्पर पंप, साईड पॅनेल, वायर हारनेस, इंजिन पॅनले, होल्डर, मिटर, एबीएस सर्किट, मागचे शॉकअप, स्वीच कंट्रोल एलएच, स्वीच कंट्रोल, पेट्रोल टँक कव्हर, साईड मास्क, साईड सेंसर, पोजीशन लॅम्प असे कएूण 52 हजार रुपये किमतीचे पार्ट मिळून आले आहे. ते जप्त करण्यात आले आहे.
शनिपेठमधून चोरीच्या दुचाकीचे मिळाले पार्ट
सराफ बाजार परिसरातील रहिवासी विशाल अशोक जगदाळे हे कुटूंबियांसह वास्तव्यास आहेत़ 9 फेब्रुवारीला घराजवळ बोहरा गल्लीत त्यांनी त्यांची केटीएम ही महागडी दुचाकी उभी केली होती़ दरम्यान, मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास तोंडाला रूमाल बांधलेल्या तीन तरूणांनी ही दुचाकी चोरून नेली होती़ याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या दुचाकीचे संशयितांकडून स्पेअरपार्ट मिळालेले आहे.