अमळनेर । तालुक्यातील प्र.डांगरी येथील विकासोत सन 2010-11 ते आजपावेतो शेतकर्यांनी कुठलेही कर्ज मागणी नसतांना, प्रत्यक्ष कर्ज उचल केलेले नसताना व सभासद बाहेरगावी असतांना व मयत असतांना खोटे दस्तवेज तसेच खोट्या हिशोबी नोंद करून परस्पर कर्ज रोखे तयार करून तत्कालीन चेअरमन, सचिव, क्लार्क यांनी शेतकर्यांची फसवणूक करून सुमारे 90 ते 95 लाख रूपयांचा घोटाळा केल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी, सहा.निबंधक सहकारी संस्था तसेच जिल्हा बँकेचे व्यवस्थापक यांना निवेदन देवून सायंकाळी 4 वाजेपासुन बॅकेच्या कार्यालयात हातात विषारी औषध बाटली घेवून शेतकरी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
घोटाळ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी
संस्थेचे तत्कालीन व विद्यमान चेअरमन अनिल शिसोदे, विद्यमान सचिव मोहन पवार व तत्कालीन सचिव कमलाकर शिसोदे या तिघांनी 2010-11 पासून सभासदांच्या नावाने कर्ज मागणी नसतांना सभासदांच्या नावाचे खोटे कागदपत्र तयार करून व खोट्या हिशोबी नोंदी करून सभासदांना प्रत्यक्ष कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतकर्यांच्या नावे कर्ज काढून चेअरमन यांनी गैरव्यवहार केलेला आहे. त्यात काही शेतकरी हे राष्ट्रीय कृत बँकेतून नियमित कर्ज घेत आहेत अशा शेतकऱयांच्या नावावर देखील परस्पर कर्ज काढण्यात आले आहे. आता विकासोने शेतकर्यांना कर्ज परत फेड करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. शासनाकडून आलेला विम्याचा लाभ देखील शेतकर्यांना न देता तो परस्पर चेअरमन व सचिव यांनी काढलेला आहे. सदरचा घोटाळा हा संस्थेचे चेअरमन, सचिव, जेडीसीसी बँकेचे कर्मचारी यांच्या संगममताने हा आर्थिक व्यवहार झालेला आहे. सदर कर्ज हे जिल्हा बँक शाखा मारवड शाखेच्या सोसायटीच्या कर्मचार्याकडे रोख पैसे कर्जदार सभासद नसतांना कर्ज दिले कसे असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.
इच्छा मरणाची मागणी
सदरच्या घोटाळ्याबाबत तात्काळ चौकशी व लेखापरीक्षण होऊन हस्ताक्षर तज्ञांकडून पडताळणी करुण मिळावी व जबाबदार असलेले संस्थेचे चेअरमन अनिल शिसोदे, सचिव मोहन पवार, क्लार्क कमलाकर शिसोदे व बँकेचे कर्मचारी यांच्याविरुद्ध करवाई व्हावी अन्यथा 15 ऑगस्टच्या आत न्याय न मिळाल्यास 50 शेतकर्यांच्या स्वाक्षरीसह इच्छामरणाची परनवागी मागितली. बँकेत दिनेश शिसोदे, प्रशांत भालेराव पाटील, लक्ष्मण उत्तम पाटील, गुलाबराव पोपट पाटील, आनंद शिरसाठ, महेंद्र शिसोदे,कैलास भोई,साहेबराव पाटील, मुकेश शिसोदे आदि होते.
हा आर्थिक गैरव्यवहार सचिवाने केला असून त्याच्या विरुद्ध गेल्या चार महिन्यापासून तक्रारी सुरु आहेत. त्यात माझा काहीएक सबंध नाही. सर्व चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असून मला स्वतःला सचिवाने बनावट पावती दिलेली आहे.
– अनिल शिसोदे, चेअरमन विकासो प्र डांगरी
कर्ज प्रकरणाची सर्व कागदपत्रे मारवड शाखेच्या कस्टडीत आहेत. मुख्य कार्यालयातून आदेश आल्याशिवाय कोणतेच कागद व आश्वासन देवू शकत नाही. मी चौकशी अधिकारी असून प्र. डांगरी विकासोचे दप्तर ताब्यात घ्यायचे आहे.
– पंडीत पाटील,
विभागीय व्यवस्थापक जिल्हा बँक