बारामती । माळेगाव गावातील रस्ते अतिशय खराब झाले असून यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांच्या गटबाजीमुळे हे रस्ते रखडले गेल्याची माहिती आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांमध्ये दोन गट असून एका गटाचे म्हणणे असे आहे की, गावातील अंतर्गत रस्ते हे सिमेंटचे असावेत. तर दुसर्या गटाचे म्हणणे आहे की, गावातील अंतर्गत रस्ते हे डांबरी असावेत. या वादात रहिवाशांचे प्रचंड हाल हो आहेत.
जनशक्तिने वस्तूस्थिती प्रथम मांडली
माळेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत माळेगाव सहकारी साखर कारखाना व उच्च दर्जाची शैक्षणिक संकुले आहेत. गावात जवळपास दोन हजारच्यावर विद्यार्थी रहात आहेत. हे सर्व विद्यार्थी बाहेर गावावरून, दुरवरून शिक्षणासाठी येथे आलेले आहेत. या विद्यार्थ्यांनाही या गैरसोयीबद्दल आश्चर्य वाटत आहे. या विद्यार्थ्यांमध्येही रस्त्याच्या खराबीविषयी चांगलीच चर्चा सुरू आहे. पावसाळ्यापूर्वीच ही रस्त्यांची कामे व्हायला पाहिजे होती अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. गेली चार वर्ष या खराब रस्त्याविषयी केवळ चर्चा सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरूवात होत नाही. हेही एक मोठे रहस्यच आहे. दैनिक जनशक्तिने ही वस्तूस्थिती प्रथमत: प्रकाशात आणली आहे. त्यामुळे गावात याविषयी पुन्हा चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या वृत्तामुळे ग्रामपंचायत सदस्यांवर दबाव वाढत चालला आहे. या दबावाचाच परिणाम म्हणून येत्या आठवडाभरात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वच्छतेची बोंबाबोंबच!
गावामध्ये कमीत कमी वीस हजाराच्यावर मोठाले खड्डे आहेत. यातून वाहन चालवणे तर सोडाच पायी चालणेही मुश्किल बनत आहे. सध्या दररोज पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे खड्डयात पाणी साचले जाते. त्यामुळे वाहनचालकाला खड्डा की रस्ता हेच समजत नाही. तरीही मात्र पदाधिकारी सुस्त आहेत. याबद्दल ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे चांगले स्त्रोत असूनही ग्रामपंचायतीच्या अंतर्गत रस्त्यांच्या समस्या सुटत नाहीत व स्वच्छतेची बोंबाबोंबच आहे. पाऊस सातत्याने राहिला तर रोगराई पसरण्यास फार वेळ लागणार नाही. वास्तविक पाहता दोनही गटांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन चांगल्या दर्जाचे रस्ते व्हावेत एवढीच माफक अपेक्षा ग्रामस्थांची आहे.