डांभुर्णीत पती-पत्नीची आत्महत्या

0

डांभूर्णी ता. यावल । अगदी सुखा-समाधानात राहत असणार्‍या येथील एका दाम्पत्याने गुरूवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिठाराम रघुनाथ कोळी (वय-30) व मनिषा मिठाराम कोळी (वय-28) यांनी आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे सर्वांसोबत अतिशय मनमिळावूपणाने राहणार्‍या या जोडप्याने नेमके कशामुळे मृत्यूला कवटाळले? याचा उलगडा मात्र झालेला नाही. या घटनेमुळे डांभुर्णी गावावर शोककळा पसरली आहे. दोघांचे मृतदेह जळगाव येथे शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. मिठाराम यांच्या पश्‍चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

सकाळी उघड झाली घटना
येथील वाल्मिक नगरातील रहिवाशी असलेले रघुनाथ कोळी (भोलाणेकर) यांचा मुलगा मिठाराम आणि त्यांची पत्नी मनीषा हेदेखील स्वतंत्र मात्र जवळच राहत होते. या दोघांचा सुमारे सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तर सहा वर्षांपासून ते दुसरीकडे राहत होते. या दोघांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. दरम्यान, आज सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारी एक महिला ही मनीषा कोळी यांच्याकडे चहा-पावडर मागण्यासाठी आली असता घरातून कोणीही प्रतिसाद दिला नाही. यामुळे तिला संशय वाटला. दरम्यान, तिने खिडकीतून पाहिले असता मिठाराम आणि मनीषा हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्या महिलेने आरडा-ओरड करत सर्वांना बोलावल्याने ही घटना समजली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच धाव घेवून मिठाराम यांचे मोठे भाऊ वासुदेव जवळच राहत असल्याने त्यांना मिठाराम व त्यांच्या पत्नीने गळफास घेतल्याची माहिती दिली.

नियोजनबध्द आत्मघात
मिठाराम आणि मनीषा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अचूक नियोजन केल्याने अनेक घटनांवरून दिसून आले. एक तर मनीषाने काल रात्रीच आपल्या माहेरच्या सर्व आप्तांना फोन लाऊन त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारला. तिने सर्वांची ख्याली-खुशाली विचारत आपले सर्व काही ठिक सुरू असल्याचे सांगितले. तर मिठाराम हा कालच त्यांचे वडील रघुनाथ कोळी यांना ते आजारी असल्यामुळे अडावद येथील डॉक्टरकडे घेऊन गेला. त्याने वडिलांचे आस्थेवाईकपणे विचारपूस घेत काळजी घेण्याचे सुचविले. दरम्यान, मिठाराम कोळी हा फारसा शिकला नसला तरी मनीषा सुशिक्षित होती. यामुळे तिने आत्महत्या करण्याआधी घरातील भिंतीवर कोळशाने ‘आम्हाला कुणाचाही त्रास नाही आम्ही आमचे मरत आहे’ असे लिहून ठेवले होते. एवढेच नव्हे तर आत्महत्या करण्याआधी त्यांनी दोघांचे पासपोर्ट फोटोदेखील बाजूलाच काढून ठेवले होते. यामुळे त्यांनी पूर्ण विचारांती हा निर्णय घेतल्याची घटनास्थळी चर्चा होती. तर आप्तांच्या म्हणण्यानुसार लग्नास सात वर्षे झाली तरी मुल-बाळ नसल्यामुळे हे दाम्पत्य अनेकदा खंत व्यक्त करत असे. यामुळे या नैराश्यातूनच त्यांनी आत्मघाताचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सायंकाळी अंत्यसंस्कार
मिठाराम रघुनाथ कोळी आणि मनीषा मिठाराम कोळी यांच्या आत्महत्येप्रकरणी यावल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय तांदळे, कॉन्स्टेबल विकास सोनवणे व सुनील तायडे हे करत आहे. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात पाठविले. सायंकाळी या दोघांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात डांभुर्णी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.