डांभूर्णीला शेतातील दारुचा कारखाना उद्धस्त

0

राज्य उत्पादश शुल्क विभागाची कारवाई ; मद्यासह चारचाकी, दारु निर्मितीचे मशीन असा मुद्देमाल जप्त

जळगाव : यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे गावाबाहेर शेतात एका घरात सुरु असलेला बनावट विदेशी व देशी दारु निर्मितीचा कारखाना सुरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाच्या पथकाने गुरुवारी कारवाई करुन हा कारखाना उध्वस्त केला तसेच चारचाकी, वाहन, देशी, विदेशी बनावट दारु, बाटल्या पॅकींगचे तसेच दारु निर्मितीचे मशीन असा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या 4 संशयितांमध्ये एक ग्रा.पं.चा सदस्य असल्याची माहिती मिळाली असून म्होरक्या फरार झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथकाची नियुक्ती केली असून अवैध दारुवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी बनावट देशी व विदेशी दारु डांभुर्णी येथे तयार केली जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस.एल.आढाव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी खात्री करण्यासाठी खबर्‍यामार्फत कर्मचारी पाठविले होते.

शेतातील घरात सुरु होती निर्मिती
रात्री 10 ते पहाटे 4 या वेळेतच दारु निर्मिती केली जात असल्याने आढाव यांनी भरारी पथकाचे निरीक्षक संजय कोल्हे, नरेंद्र दहिवडे, भरत दौंड, दुय्यम निरीक्षक जमनाजी मानेमोडे, हशमोड, कर्मचारी मुकेश पाटील, रघुनाथ सोनवणे, विजय परदेशी, अमोल पाटील, दिनकर पाटील, विपुल राजपूत, नंदू नन्नवरे व रवी जंजाळे यांचे पथक बुधवारी मध्यरात्री डांभुर्णी येथे धडकले. दारु निर्मिती होणाजया घरालाच घेरुन चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले. गुरुवारी पहाटे सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. याप्रकरणी विजय परदेशी यांच्या फिर्यादीवरुन पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 संशयितासह 3 लाख 46 हजाराचा माल जप्त
यावेळी विशाल काशिनाथ फालक (29), शरद युवराज कोळी (30), सुनील एकनाथ सोनवणे (45) व कपील मधुकर सरोदे (40) सर्व रा.डांभुर्णी, ता. यावल या चौघांना अटक करण्यात आली असून सरोदे हा ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. मुख्य सूत्रधार जितेंद्र लालचंद सोनवणे (रा.वढोदा, ता.यावल) हा फरार झाला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 3 लाख 46 हजार 185 रुपये इतकी आहे.