डांभूर्णी खुनातील आरोपीला नेणार्‍या वाहनावर जमावाची दगडफेक

0

यावल पोलिस निरीक्षकांनी गोपनीय माहितीवरून आवळल्या आरोपीच्या मुसक्या

यावल : दहावीत शिकणार्‍या तालुक्यातील डांभूर्णी येथील 16 वर्षीय विद्यार्थ्याच्या खूनानंतर पसार झालेल्या आरोपीच्या शनिवारी सकाळी यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी मुसक्या आवळल्या होत्या तर या घटनेची कुणकुण लागताच संतप्त जमावाने आरोपीला नेणार्‍या वाहनावरच दगडफेक केल्याची घटना शनिवारी घडल्याने खळबळ उडाली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत आरोपीला जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणल्याचे सांगण्यात आले. यश चंद्रकांत पाटील (26) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

खुनानंतर आरोपीने काढला होता पळ
डांभूर्णी येथील रहिवासी व इयत्ता दहावीत शिकणार्‍या कैलास चंद्रकांत कोळी (16) या विद्यार्थ्याचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. या प्रकरणी या आरोपी यश चंद्रकांत पाटील याच्याविरूद्ध शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला होता. आरोपी गावाजवळील जंगलात लपून असल्याची माहिती यावलचे निरीक्षक अरुण धनवडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सुनील तायडे, विकास सोनवणे या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली होती मात्र आरोपीला अटक केल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केल्यानंतर तणावाची परीस्थिती निर्माण न होण्यासाठी धनवडे यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडे आरोपीला जळगावात नेण्याचे कळवले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक दोन वाहनाद्वारे ममुराबादमार्गे जळगावकडे निघाल्यानंतर संतप्त जमावाने आरोपीला ज्या वाहनातून नेण्यात येत होते त्या वाहनावरच दगडफेक केली होती. दरम्यान, पोलिसांनी डांभूर्णी गावात कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याचे सूत्रांनी सांगितले.