डाऊन एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसचा अपघात टळला

भुसावळात बदलला एसी कोच : गाडीला तीन तास खोळंबा ; जनरल डबा जोडल्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाना

भुसावळ : सी अ‍ॅण्ड डब्ल्यू कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे 15017 डाऊन एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसचा सोमवारी अपघात टळला. गाडीतील बी-2 या वातानुकूलित बोगीचे चाक (व्हील स्प्रेड) लांबल्याची बाब परीक्षणात उघड झाल्यानंतर तातडीने रेल्वेच्या अधिकार्‍यांनी धाव घेतली. तब्बल तीन तास 10 मिनिटांच्या विलंबानंतर एसी कोच भुसावळात उपलब्ध नसल्याने सर्वसाधारण (जनरल) डबा जोडून गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. विलंबामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाल्याने त्यांनी रेल्वेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. दरम्यान, सतर्क रेल्वे कर्मचार्‍यांच्या वेळीच लक्षात ही बाब आल्याने गाडीचा अपघात टळला अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता होती.

सतर्कतेमुळे टळला अपघात
रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईहून गोरखपूरकडे निघालेल्या डाऊन 15017 गाडीचे भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक पाचवर सोमवारी दुपारी दोन वाजता आगमन होत असतानाच सी अ‍ॅण्ड डब्ल्यू विभागातील कर्मचारी व मास्टर क्राप्टमन बनिराज मीना व टेक्नीशीयन संतोष ढोके यांना कोच क्रमांक बी- 2 (17132/सी.एन.ई.) चे व्हील स्प्रेड झाल्याचे लक्षात आले. कर्मचार्‍यांनी ही बाब वरीष्ठांना कळवताच रेल्वे स्टेशन संचालक जी.आर.अय्यर व सहाय्यक अभियांत्रिकी अभियंता मो.फिरोज राठोड यांनी धाव घेत पाहणी केली. भुसावळात पर्यायी एसी कोच न नसल्याने नादुरुस्त व्हील असलेली एसी बोगी गाडीपासून वेगळी करण्याचा निर्णय घेण्यात आला व पर्यायी जनरल बोगी जोडण्यात आली. या प्रक्रियेत तब्बल तीन तास 10 मिनिटे गाडी स्थानकावरच खोळंबून होती. दुपारी पाच वाजून 10 मिनिटांनी गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

प्रवाशांना एसी तिकीटाचा परतावा
मुंबईहून गोरखपूरसाठी एसी बोगीतून प्रवासासाठी आरक्षीत तिकीटांद्वारे प्रवास करणार्‍या प्रवाशांना भुसावळून गोरखपूरकडे जनरल डब्यातून प्रवास करावा लागल्याने त्यांच्याकडून केवळ जनरलचे भाडे आकारण्यात आले तर भुसावळ ते प्रवाशाच्या नियोजित स्थानकादरम्यानचे वातानुकूलित बोगीचे भाडे पावती देवून परत करण्यात आल्याचे स्टेशन संचालक जी.आर.अय्यर यांनी सांगितले. दरम्यान, आधीच शहराचे वाढलेले तापमान व त्यातच तब्बल तीन तास गाडी स्थानकावर खोळंबल्याने रेल्वे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.