भुसावळ- रेल्वे प्रशासनाने रविवारी सुमारे पाच तासांच्या घेतलेल्या मेगा ब्लॉकमुळे डाऊन मार्गावरील चार सुपरफास्ट गाड्यांमधील प्रवाशांना याचा फटका बसला. डाऊन मार्गावर असलेल्या कामामुळे हा ब्लॉक घेतला होता. सकाळी सात ते दुपारी 12 वाजेपर्यत हा ब्लॉक असल्याने भुसावळकडे येणार्या गितांजली एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस, तुलसी एक्स्प्रेस व अमदाबाद हावडा एक्स्प्रेस या गाड्या जळगावच्या पलिकडे थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सुमारे 1.30 मिनीटे गाड्या विलंबाने स्थानकावर पोचल्यात.
विविध कामांसाठी मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मेटेनन्सचे काम सुरू आहे. रविवार भुसावळ ते जळगाव दरम्यान चार ठीकाणी कामे सुरू होती. त्यामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. रेल्वे मार्गाच्या देखभालीचे काम युध्द पातळीवर हाती घेतले असल्याने या मार्गावर रविवारी रेल्वे प्रशासनाने पाच तासांचा डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेतला होता. अवघ्या पाच तासांच्या ब्लॉकच्या काळात रेल्वे प्रशासनाने विभागात विविध ठीकाणी दुरूस्तीची कामे करून घेतली. यात भुसावळ स्थानकाजवळील प्लॅटफॉर्म सहा जवळील जीर्ण पूल काढला तसेच रेल्वे यार्डातही नवीन रेल्वे लाईन जोडण्याचे काम करण्यात आले. यार्डात 9.40 ते दुपारी 2.40 या वेळात ब्लॉक घेतला होता. जळगाव-आसोदा येथे कामे करण्यात आली.