भुसावळ। येे थील स्टेशन रोडवरील मुख्य डाक कार्यालयात महिना अखेरीस जेष्ठ नागरिकांना आपल्या खात्यातून रक्कम काढणे, बचत खात्यावर रक्कम जमा करणे आदी कामांसाठी यावे लागते. मात्र प्रत्येक खातेधारकामागे 15 ते 20 मिनीटे लागत असल्यामुळे वयोवृध्दांना तासन् तास रांगेत तात्कळत उभे रहावे लागत असल्यामुळे असह्य उकाड्यात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे खातेधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मागच्या दाराने येणार्यांना अगोदर मिळतात पैसे
डाक कार्यालयात बहुतांश नागरिक आरडी बचत खाते उघडत असतात. तर काहीं सेवानिवृत्त नागरिकांनी आपली पेंशन वर्ग केली असल्यामुळे महिन्या शेवटी पैशांचा भरणा करणे किंवा काढण्यासाठी गर्दी होत असते. मात्र येथील कर्मचार्यांच्या सुस्त कारभारामुळे वयोवृध्दांना तासन् तास रांगेत उभे रहावे लागते. असे असताना परिचयातील ग्राहकांना आत बोलावून पैसे मोजून दिले जात असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.
10 ते 20 रुपयांच्या स्वरुपात मिळते रोकड
यावेळी आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी येणार्या ग्राहकांना डाक कार्यालयाकडून 10 ते 20 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात रोकड दिली जाते. मात्र ग्राहकांना मोठी रक्कम असल्यास हि रोकड वागविणे अडचणीचे ठरते. यासंदर्भात काही ग्राहकांनी विचारणा केली असता बँकेकडून रोकड उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येते.
रोकड मिळण्यास अडचण
महिना अखेर असल्यामुळे काहिंचे पेंशन वाटप केले जाते त्यामुळे डाक कार्यालयात ग्राहकांची गर्दी होत असते. तसेच कर्मचार्यांचे पगार वितरणही असल्यामुळे कर्मचार्यांनाच आत बोलावून पगार दिला जातो. बाहेरील कुठल्याही व्यक्तीला आतून पैसे दिले जात नाही. तसेच रोकडची उपलब्धता कमी असल्यामुळे अडचणी येत असल्यामुळे काही ग्राहकांना नाईलाजास्तव 10 ते 20 रुपयांच्या नोटांमध्ये रोकड दिली जात असल्याचे पोस्ट मास्टर बी.आर. वानखेडे यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना सांगितले.