चाकण : शहरांमध्ये जरी टपालसेवेस खूप पर्याय झाले असले तरी ग्रामीण भागांमध्ये अजूनही टपाल विभागास खूप महत्त्व आहे. ही बाब डाकसेवकांच्या संपामुळे प्रकर्षाने जाणवू लागली आहे. डाकसेवकांनी केलेल्या संपामुळे हजारो टपाले पोस्टातच पडून आहेत. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांपासून ते उद्योगांपर्यंत होत असल्याचे दिसून येत आहे.
पहिल्याच दिवशी प्रतिकूल परिणाम
विविध मागण्यांसाठी ग्रामीण भागातील डाक सेवकांनी बुधवार (दि. 16) पासून बेमुदत संप पुकारला आहे. मागण्या मान्य होईतोपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याची अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियनची भूमिका असल्याने आणि चाकण भागातील सर्वच डाक सेवकांनी यात सहभाग घेतल्याने चाकण परिसरातील सामान्य नागरिक, विविध बँका, पतसंस्था , शासकीय कार्यालये, एमआयडीसीतील कारखाने यांची हजारो टपाल पोस्टात पडून आहेत.ग्रामीण डाक सेवकांचा संप बुधवार पासून सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चाकण भागातील टपाल वाटपावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. शेकडो पत्रे आणि पार्सल चाकणला पोस्टातच पडून आहेत.
या आहेत मागण्या
कमलेशचंद्र कमेटीच्या शिफारशी संघटनेने सुचविलेल्या बदलानुसार ताबडतोब लागू कराव्यात, ग्रामीण डाक सेवकांना आठ तासाचे काम देऊन खात्यात सामाविष्ट करावे, ग्रामीण डाक सेवकांना न्यायालयाच्या आदेशानुसार पेन्शन सुविधा मिळावी, ग्रामीण डाक सेवकांचा टार्गेटच्या नावाखाली चाललेला छळ थांबवण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियनने बुधवार (दि.16) पासून बेमुदत संप सुरु केला आहे. शासनाने यापूर्वीही आश्वासन दिले होते; परंतु कार्यवाही होत नाही, त्यामुळे संघटनेने बेमुदत संप सुरु केला असल्याचे येथील ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियनच्या पदाधिका-यांनी सांगितले.
’शाखा डाक घर’ प्रभावित
चाकण परिसरातील महाळुंगे, कुरुळी, आंबेठाण, भोसे, शेलपिंपळगाव, काळूस, कोयाळी, बहूळ, चिंबळी फाटा , वासुली, वाकी, खालुंब्रे , गडद ,वांद्रा आदी सतरा ’शाखा डाक घर’ यामुळे प्रभावित झाली आहेत. संपूर्ण खेड तालुक्यातील सुमारे 77 शाखा डाकघर या संपामुळे ठप्प आहेत. चाकण एमआयडीसीमधील शेकडो टपाल, स्पीड पोस्ट चाकणच्या पोस्ट कार्यालयातच धूळखात पडून असल्याचे युनियनचे पदाधिकारी व डाक सेवक संजय जगताप, संदीप महाळुंगकर, दिलीप मांडेकर, प्रशांत गुरव, सुभाष भोंडवे, रामचंद्र माळशीकर, शिवाजी पाचपुते, दत्ता टांकसाळे, विकास राउत, दतात्रेय शिंदे आदींनी सांगितले.