डाटा एन्ट्रीच्या नोकरीचे आमिष अन् मार्केटींग करायला सांगून तरुणाची फसवणूक

0

तरुणाने केली एमआयडीसी पोलिसात तक्रार ; ग्लेझ ट्रेडींग कंपनीप्रमखासह साथीदारांना एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव : दिल्ली ग्लेझ ट्रेडींग कंपनीचे येथील खेडी पेट्रोल पंपाच्या मागे ओम साई नगरात एका अलिशान इमारतीत नारायणी असोसिएटस् फ्रॅँचाइजी (शाखा)आहे. याठिकाणी कार्यरत एका कर्मचार्‍याने डाटा एन्ट्री ऑपरेटरचे नोकरीचे सांगून प्रत्यक्षात सौदर्य प्रसाधनाच्या उत्पादनांची मार्केटींग करायला लावून राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी शहरातील शाखा प्रमुखासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश कुमार याने जिल्ह्याची फ्रॅचांइजी घेतलेली आहे. आदीनाथ दत्तू भिंगारे (20, रा.देवळाली प्रवरा, ता.राहुरी, जि.अहमदनगर) या तरुणाला अविनाश विक्रम काळे याने डाटा एन्ट्रीची नोकरी मिळेल असे सांगून जळगावात बोलावून घेतले. 28 जूनपासून भिंगारे खेडी परिसरात आलेला आहे. जेवणाचा खर्च सांगून त्याच्याकडून 18 हजार रुपये घेण्यात आले. डाटा एन्ट्रीचे काम न देता त्याला सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू विक्रीसाठी देण्यात आल्या. डाटा एन्ट्रीच्या नोकरीबाबत जाब विचारला असता, तुला हेच काम करावे लागेल असे सांगून हाकलून लावले. त्याने भरलेले पैसे परत मागितले असता ते देखील दिले नाहीत. गावाला परत जाण्यासाठी भाड्यालाही पैसे नसयाने भिंगारे याने एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून फसवणूक झाल्याची तक्रार केली.

तक्रारीची दखल घेत पाच जण ताब्यात
पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी तक्रारीची दखल घेत कॉ.निलेश पाटील व असीम तडवी या कर्मचार्‍यांना चौकशीसाठी पाठविले. खेडी येथे एका इमारतीत 40 ते 50 तरुण आढळून आले. तेथे कंपनीच्या कर्मचार्‍यांकडे चौकशी केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देवू लागले. त्यामुळे पोलिसांनी प्रशांत राजू उदमले (25, रा.श्रीगोंदा, जि.अहमदनगर), संपत सिताराम दहिफडे (25,रा.पाथर्डी, जि.अहमदनगर), आदेशखान मुसाखान पठाण(24, रा.बोदर्डी, ता.उमरखेड, जि.यवतमाळ), अविनाश विक्रम काळे (23) व सूरज संजय दिवे (रा.देवळाली प्रवरा, ता.राहुरी, जि.अहमदनगर) या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. स्थानिक प्रमुख ओमप्रकाश कुमार याने कंपनीचे काम नियमानुसार असल्याचा दावा त्याने केला आहे.

तरुणाकडून करुन घेतला करारनामा
कंपनीमार्फत सौंदर्य प्रसाधनांची मार्केटींग व विक्री केली जाते. साखळी पध्दतीने चालणार्‍या या कामात 9 ते 30 टक्क्यापर्यंत कमिशन दिले जाते. काम देताना या बेरोजगार तरुणांकडून छापील करारनाम्यावर सह्या घेतल्या जातात. त्यात मी कोणतेही पैसे कंपनीत भरलेले नाहीत व जेवणाचा व राहण्याचा खर्च स्वत:च करेल तसेच मी कोणाकडेही तक्रार करणार नाही आणि केली तर निरंक राहिल असा करारनाम्यावर उल्लेख आहे. प्रत्यक्षात सुुरुवातीलाच तरुणांकडून 16 ते 20 हजाराच्या दरम्यान रक्कम घेण्यात येत आहे. त्यात दोन वेळचे जेवण व राहण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे तरुणांनी सांगितले.