मुख्याध्यापकाने भरवली लाचखोरीची शाळा
नंदुरबार- सहकारी शिक्षिकेकडून शेरेबुकावर चांगला शेरा देण्यासाठी 500 रुपयांची लाच मागणार्या डामरखेडा जिल्हा परीषद शाळेतील मुख्याध्यापक मोरसिंग सोनू राठोड यांना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता नंदुरबारात अटक करण्यात आली. मुख्याध्यापकाने लाचखोरीची शाळा भरवल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
500 रुपयांची लाच भोवली
तक्रारदार यांच्या पत्नी या डामरखेडा शाळेत शिक्षिका असून त्यांच्या शेरेबुकावर चांगला शेरा देण्यासाठी आरोपी मोनसिंग राठोड यांनी 13 रोजी लाचेची मागणी केली होती. नंदुरबार एसीबीकडे शिक्षिकेच्या पतीने तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. नंदुरबार येथे दंडपाणेश्वर रोड येथे आरोपी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेतच्या सुमारास लाच घेत असताना त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संगीता पाटील व सहकार्यांनी केले.