पॅरिस । ज्युनिअर गटातील जागतिक विजेता भारताच्या निरज चोप्राने पॅरीसमध्ये सुरु असलेल्या डायमंड लीग स्पर्धेतील अव्वल दहा खेळाडूंचा समावेश असलेल्या भालाफेक स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला आहे. जर्मनीच्या जोहान्स वेट्टरने 88.74 मीटर अशी फेक करत सुवर्णपदक मिळवले. झेक रिपब्लीकचा जाकुब वाडलेच दुसरे स्थान मिळवताना 88.02 मीटर अशी कामगिरी नोंदवली. ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या थॉमस रेरहेरला यावेळी तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. चांगली सुरुवात करण्यास अपयशी ठरलेल्या नीरजकडून भुवनेश्वर येथे 6 ते 9 जुलैदरम्यान रंगणार्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत पदकाची आशा बाळगली जात आहे.
सर्वोत्तम कामगिरी
डायमंड लीग स्पर्धेत समाधानकारक कामगिरी करताना निरजने वैयक्तिक कामगिरी उंचावली आहे. 19 वर्षीय निरजची आतापर्यत 84.67 मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी होती. पॅरीसमध्ये निरजने 86.48 मीटर अशी आपल्या कामगिरीत सुधारणा केली.
निरजने तिसर्या प्रयत्नात हा वैयक्तिक उच्चांक साधला. पहिल्या प्रयत्नात निरजने 79.54 मीटर अशी फेक केली होती. दुसर्या प्रयत्नात आणखी सुधारणा करताना त्याने 81.32 मीटर अशी कामगिरी नोंदवली. चौथ्या प्रयत्नात 78.69 मीटर आणि पाचव्या प्रयत्नात 79.52 मीटर अशी कामगिरीत घसरण झाल्यामुळे निरजला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.