डार्क झोन असताना अनधिकृतरीत्या भूगर्भातील पाणी वळवले

0

केर्‍हाळा परीसरातील शेतकरी संतप्त ; तहसीलदारांन निवेदन, पाणीप्रश्‍न पेटण्याची चिन्हे

रावेर- तालुक्यातील केर्‍हाळा, मंगळुर, पिंप्री, परीसरात डार्क झोन असताना या परीसरात अनधिकृत ट्युबवेल करून भूगर्भातील पाणी अहिरवाडी, पाडला परीसरातील शेतकरी नेत असून हा प्रकार प्रशासनाने दखल देऊन तातडीने थांबवण्याची मागणी केर्‍हाळा परीसरातील शेतकर्‍यांनी तहसीलदार विजयकुमार ढगे यांना निवेदनाद्वारे केली आहे. चिनावल परीसरातील पाणीप्रश्नानंतर केर्‍हाळा परीसरातील पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत.

पाणी पळवले जात असल्याने केर्‍हाळेकर संतप्त
अहिरवाडी परीसरातील शेतकरी केर्‍हाळे येथील अल्पभूधारक शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला देऊन त्यांची जमीन घेऊन त्यावर ट्यूबवेल करीत आहेत. पाईप लाईनद्वारे हे पाणी अहिरवाडी, पाडलाच्या जंगलात नेण्यात येत आहे. या प्रकारास केर्‍हाळा येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. अनधिकृत ट्युबवेलींवर कारवाई करावी तसेच त्यांना वीज कनेक्शन देण्यात येऊ नये, अशी विनंती शेतकर्‍यांनी केली आहे. केर्‍हाळा येथील माजी सरपंच विशाल पाटील, महेश पाटील, कैलास पाटील, अनिल पाटील, विशाल पाटील, किरण पाटील, वासु महाजन, प्रकाश चौधरी, प्रभू पाटील, गोपाल पाटील, मनोज पाटील, चंदू पाटील, संजय पाटील, विनोद पाटील, प्रल्हाद पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

अशी आहे मूळ समस्या
केर्‍हाळा, भोकरी, पिंप्री, मंगळूर परीसरातील शेतीसाठी ट्यूबवेल, विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी भूगर्भ रिचार्ज व्हावे यासाठी केर्‍हाळा गावातील शेतकरी लोकवर्गणी करून मंगळूर धरणातून भोकर नदीत पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला रीतसर फी भरून पाणी नदीत सोडण्याची मागणी करतात. पाणी सुटल्यानंतर या परीसरातील शेतीच्या विहिरी, ट्यूबवेली रीचार्ज होतात व याचा फायदा शेती करण्यासाठी होतो परंतु सध्या या भागातून पाणी अहिरवाडीच्या शेतीशिवारसाठी पाईपलाईनद्वारे नेले जात असून त्यास शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे.

यंदा प्रचंड घटतेय पाण्याची पातळी
समाधानकारक पाऊस न झाल्याने केर्‍हाळा, अटवाडे, खानापूर, अहिरवाडीसह पूर्व भागातील विहिरी ट्यूबवेलच्या जलपातळीत झपाट्याने घट होत आहे. अद्याप उन्हाळा बाकी असतांना घटणारी जलपातळी प्रचंड चिंताजनक आहे.