चाकण : झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून अंदाजे वीस ते पंचवीस वर्षीय अनोळखी तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार खालुंब्रे गावच्या हद्दीत उघडकीस आला आहे. संबंधिताची ओळख अद्याप पटली नसल्याने आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चाकण पोलिसांत शनिवारी ( दि. 10 ) याप्रकरणी आकस्मित मयत अशी नोंद करण्यात आली आहे. या बाबतची अधिक माहिती अशी की, खालुंब्रे गावच्या हद्दीतील के.एस.एच. कंपनीच्या समोरील मोकळ्या जागेत एक पत्राशेड आहे. या पत्र्याच्या शेडलगत असलेल्या ओढ्याजवळील एका झाडाच्या फांदीला तरुणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. त्याची ओळख व त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नाही. गावचे पोलीस पाटील रवींद्र मनाजी तुळवे यांनी फिर्याद दिली.
सबंधित तरुणाचा रंग काळा सावळा, डोक्याचे केस काळे, काळ्या मिशा, अंगात सफेद रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, नेसणीस निळ्या रंगाची जीन्स, हातात रंगीत दोरा असे त्याचे वर्णन आहे. या तरुणाबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी चाकण पोलीस ठाण्याशी संपर्क ( फोन नं. 02135 – 249333 ) साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.