जळगाव । एमआयडीसीतील ई सेक्टरमधील एका दालमिलमध्ये शनिवारी रात्री डाळीचे 27 कट्टे चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन तासात कंपनीच्या वॉचमनसह तीघांना अटक केली. चोरी केलेल्या डाळीचे काही कट्टे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. इ सेक्टरमध्ये प्रेमचंद राजमल चोरडीया यांच्या मालकीची राज उद्योग नावाची दालमिल आहे. येथे उडीड व मुगाच्या डाळीवर प्रक्रीया केली जाते. शनिवारी एमआयडीसी बंद असल्यामुळे चोरडीया यांची दालमिल देखील बंद होती.
प्रेमचंद चोरडीया हे शनिवारी रात्री 8 वाजता कंपनीत फेरफटका मारून गेले. त्यानंतर रविवारी सकाळी 8 वाजता त्यांचा मुलगा निर्मल हा कंपनीत आला. त्यावेळी वॉचमन दिलीप कुळकर्णी याने कंपनीत चोरी झाल्याची माहिती त्यांना दिली. कंपनीत कुळकर्णीसह राजाराम सुकदेव पाटील हे देखील वॉचमन आहेत. चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरडीया यांनी चोरीस गेलेल्या मालाची तपासणी केली. तपासणीअंती 48 हजार रूपये किमतीचे उडीद डाळीचे 27 कट्टे चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वॉचमन पाटील याच्या गोकुळ हंसराज राठोड (रा.लोणसांगवी, ता.चाळीसगाव) व शरीफ गफ्फार पटेल (रा.पोलिस कॉलनी, सुप्रिम कॉलनी, जळगाव) या तीघांना अटक केली. त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. तीघांनी शनिवारी रात्री चोरडीया यांच्या कंपनीच्या लगत असलेल्या दुसर्या एका कंपनीच्या गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर चोरडीया यांच्या कंपनीच्या तार कंपाऊंडच्या तारा वाकवून कंपनीत प्रवेश केला आहे. याच जागेतून त्यांनी उडीद डाळीचे 27 कट्टे चोरून नेले. असे पोलिस तपासात समोर आले आहे.