डाळिंबावर तेल्या, डांबर्‍या रोगाचा प्रार्दुभाव

0

निमगाव केतकी । दोन-तीन वर्षांपासून तेल्या रोगाने पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त क्षेत्र असलेल्या इंदापूर तालुक्यातील बहुतांश डाळिंब बागाांवर 50 टक्क्यांपेक्षा जास्त तेल्याचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याच्या जोडीला डांबर्‍यानेही जोर धरल्याने उत्पादक या दोन्ही रोगांपुढे हतबल झाला आहे. त्यातच मालाला भाव नसल्याने बागा जगवायच्या कशा, ही समस्या निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांची आर्थिक ऐपत न राहिल्याने तेल्या रोगाच्या निर्मूलनासाठी सरकारने भरीव अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

आर्थिक उत्पन्न देणारे पीक म्हणून डाळिंब पिकाची मागील आठ दहा वर्षात झपाट्याने वाढ झाली. ज्यावेळी उत्पादन खर्च कमी होता त्यावेळी किलोला शंभर रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र अलीकडे रोगराईमुळे खर्च वाढला आहे. वारंवार बदलत्या व प्रतिकूल हवामानामुळे तेल्याचा प्रादुर्भावा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकरी सरासरी सात टना पर्यंत माल निघाला, तर यातील निम्मा माल तेल्या व डांबर्‍या रोगाच्या प्रादुर्भावामुळे फेकून द्यावा लागत आहे. मजुरी, औषधे, खते यात प्रचंड वाढ झाली आहे. हाताखाली आणलेल्या बागा रोगांमुळे उपटून टाकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे, असे डाळिंब उत्पादक संघाचे संचालक अतुल शिंगाडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले. तेल्यासाठी आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.