पुणे : डाळींबाचा हंगाम बहरल्याने रविवारी गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात हंगामातील विक्रमी आवक झाली. श्रावण महिना सुरू असून त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असल्याने येत्या काळात डाळिंबांना मागणी वाढून दर थोडे वधारतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण मागणीपेक्षा आवक वाढल्यामुळे डाळिंबाचे भाव सुमारे पाच ते दहा टक्क्यांनी उतरले आहेत.
मागील आठवड्यात स्वातंत्र्यदिन, नागपंचमी तसेच शनिवारी बाजारास असलेली साप्ताहिक सुट्टी याखेरीज पुणे विभागातील बहुतांश ठिकाणी पावसास सुरवात झाल्याने त्याचा परिणाम आवकेवर झाला आहे. सध्या घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असून एक किलोसाठी डाळिंबाला ४० ते ६० रुपये मोजावे लागत आहे.