नवापूर । तालुक्यातील मौजे डाळीआंबा येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बंधार्यातून गाळ काढणे कामाचा शुभारंभ जि.प. अध्यक्षा रजनी नाईक यांच्या हस्ते महिन्याभरापूर्वी झाला होता. या गावातील लोकांनी श्रमदान केले आहे. या कामाची पाहणी मंगळवारी तहसीलदार प्रमोद वसावे, नायब तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सरपंच अंकुशराव वसावे, उपसरपंच दिलीप वळवी यांनी केली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामासाठी 178 ग्रामस्थ रोज श्रमदान करीत होते.
70 टक्के काम पूर्ण
डाळीआंबा गावातील हा बंधारा काही वर्षांपासून तुटल्यामुळे गावात पाण्याची टंचाई भासत होती. मात्र या गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीने 1 महिन्यापूर्वी कामाला सुरुवात झाली होती. आता हे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. या बंधार्याचे काम पूर्ण झाल्याने या गावात पाण्याची टंचाई राहणार नाही, असे आश्वासन डाळीआंबा सरपंच अंकुशराव वसावे यांनी दिले. या गावातील ग्रामस्थ जास्त करुन गुजरात राज्यात कामाला जात होते. परंतु गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी गावातील ग्रामस्थांची बैठक घेतली. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन या बंधार्याच्या कामाला सुरुवात केली. त्यांनी ग्रामस्थांना सांगितले की तुम्ही गुजरातमध्ये कामाला जाऊ नका. आम्ही तुम्हाला गावातच रोजगार देऊ. त्यानुसार ग्रामस्थांनी गावातच कामाला सुरुवात केली. हे काम मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
विहिरी, बोअरवेल जिवंत होणार
बंधार्यात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे गावातील विहिरी, बोरवेल यात चांगल्या प्रमाणात पाणी राहणार आहे. यामुळे येथील शेतकरी 12 महिने शेती करु शकतील. नवापूर तालुक्यात 7 गावात बंधार्यातून गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. डाळीआंबा येथील बंधार्यात गाळ काढल्याने या वर्षी 50 टि.सी.एम. पाणी साठा थांबणार आहे.