केंद्र सरकारचा निर्णय : डाळीला चांगला भाव मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली : देशात डाळीचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व डाळींच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले आहेत. निर्यातीवरील निर्बंध हटवल्याने डाळीला चांगला भाव मिळण्याची शक्यता असून त्यामुळे डाळ उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मोठी बाजारपेठ खुली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. डाळींच्या आयात-निर्यात धोरणाबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत सर्व प्रकारच्या डाळींवरील निर्यातीबाबतचे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्यातबंदी हटवल्याने आता शेतकर्यांना मोठी बाजारपेठ खुली झाली आहे.
डाळीची उत्पादनात विक्रमी वाढ
यावर्षी डाळीचे उत्पादन 220 लाख टनांवर पोहोचले आहे. यापूर्वी डाळींचे उत्पादन आणि मागणी यात तफावत असल्याने निर्यातीवर निर्बंध होते. विक्रमी उत्पादन झाल्याने डाळीला योग्य भाव मिळत नव्हता. चणा डाळीच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 32 टक्क्यांनी वाढ झाली. तर अन्य डाळींच्या उत्पादनात सुमारे 22 टक्क्यांनी वाढ झाली. केंद्र व राज्य सरकारने डाळ विकत घेऊन शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.