नवी दिल्ली । तूर खरेदी आणि शेतकर्यांच्या मालाचे पडलेले भाव यावरून राज्यात सध्या जोरात रण सुरू असतानाच केंद्र सरकारने आणखी एक धक्का दिला आहे. डाळ साठवणुकीवरील सर्व प्रकारची मर्यादा केंद्र सरकारने हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सर्व राज्यांनाही त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साठेबाजी वाढण्याची शक्यता असून, पुन्हा एकदा डाळींचे दर वाढण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी या निर्णयाची माहिती ट्विटरवरून दिली.
या निर्णयापूर्वी डाळीचा साठा करण्यास मर्यादा होती. त्यामुळे आतापर्यंत केवळ छोटे व्यापारीच डाळ खरेदी करू शकत होते. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता बडे व्यापारी तसेच, बहुराष्ट्रीय कंपन्याही डाळ खरेदीचा व्यवहार करू शकणार आहेत. त्यामुळे या कंपन्यांनी जर डाळीचा साठा केला तर, तूर डाळींचा दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ट्विटरच्या माध्यमातून माहिती देताना केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पास्वान यांनी ‘देशात मोठ्या प्रमाणात डाळींचे उत्पादन झाले असून सध्या डाळींना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या फायद्यासाठी डाळींच्या साठवणुकीवर लावण्यात आलेली मर्यादा तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व राज्यांनाही त्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.’ असं म्हटले आहे.