डाव्यांनाही करावे लागेल सकारात्मक राजकारण

0

पुरोगामी चळवळीतील तरुण कार्यकर्ते, नेते यांनी राज्यातील कळीच्या अशा 4-5 प्रश्‍नांवर लढे उभे करण्यासाठी एकत्र यायला हवे.आदिवासी, शेती, स्त्रिया, शिक्षण, असुरक्षित कष्टकरी कामगार, वंचितांच्या प्रश्‍नावर ही मंडळी काम करत आहेत. महाराष्ट्रात सत्ता मिळवायची असेल तर काँग्रेसने त्यांच्या सरंजामी सम्राटांना बाजूला ठेवून गांधी, नेहरूंच्या स्वप्नातील सामान्य माणसाची लढाई लढणार्‍या डाव्या चळवळीतील लोकांशी जुळवून घ्यावे लागेल आणि डाव्यांनाही आता सकारात्मक राजकारण करावे लागेल. काँग्रेसमध्ये न जाताही जिग्नेश मेवाणीने ही वाट दाखवली आहे.

बेरोजगारीच्या प्रश्‍नावरील पाटीदार समाजाच्या मनातील खदखद हार्दिक पटेलने इतर मागासवर्गीय समाजाच्या रोजी रोटीच्या प्रश्‍नांना अल्पेश ठाकोरने चिवट संघर्षातून संघटित केले.आणि अमानुष दलित अत्याचारांच्या घटनांनी संतप्त झालेल्या दलित मानसिकतेला जिग्नेश मेवानीने संघटित करून गुजरात मध्ये मोदी आणि शहा यांना अडविण्याचे काम केले. पाटीदार,ओबीसी आणि उनाची घटना घडल्या नंतर दलित समाजाला एकत्र करण्याचे काम या तरुणांनी स्वतंत्रपणे केले. या तिघांनी एक गोष्ट केली.ती ठरवून केली की सहज घडली हे सांगणे कठीण आहे ती म्हणजे हे तिघे कधीही एकमेकांविरोधात बोलले नाही,एकमेकांच्या कामात हस्तक्षेप केला नाही.परंतु निवडणुकीच्या काळात मात्र भाजपाच्या विरोधात ते एकत्र आले. गुजरात मध्ये काँग्रेस कमकुवत होती.वाघेला आपल्या समर्थकासह पक्ष सोडून गेले होते.राज्यात नेता नव्हता अशा वेळी राहुल गांधी यांनी गुजरातची सूत्रे हातात घेतली आणि या तरुण मुलांनी उभे केलेल्या आंदोलनावर स्वार होत सोशल इंजिनियरिंग चा प्रयोग घडवून आणला .आणि मोदी शहाच्यां होमपीच वर भाजपा शासित राज्यातील मुख्यमंत्री, त्यांचे मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्री यांच्या झंझावाता पुढे तगडे आवाहन उभे करीत 80 जागा पटकावल्या.

2002 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला 127 जागा मिळाल्या तर काँग्रेसला 51 जागा मिळाल्या.2007 आणि 2012 मध्ये भाजपाला 117 व 115 तर काँग्रेसला 59 व 61 जागा मिळाल्या मात्र कालच्या निवडणुकीत भाजपा तीन अंकी संख्याही पार करू शकला नाही 150 जागा जिंकण्याचे स्वप्न पाहणारा भाजप 99 वर अडखळला. सत्ता मिळाली परंतु भाजपला खूप संघर्ष करावा लागला. नेमके प्रश्‍न लावून धरले आणि त्या प्रश्‍नांवर सातत्याने काम केले तर नवं नेतृत्वही उभे राहते आणि यशही मिळते हे निवडणुकीचे यश आहे, असं माझं मत आहे.

गुजरात मध्ये तगडा विरोधी पक्ष व नेता नसताना या अल्पेश, जिग्नेश आणि हार्दिक या तीन तरुण मुलांनी बलाढ्य भाजपसमोर जे आवाहन उभे केले त्याची दखल महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ कशी व कधी घेणार आहे हा आजच्या लेखाचा विषय आहे. 70-80 च्या दशकात बिहार,उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी नेते डॉ राम मनोहर लोहिया यांचे शिष्य त्यावेळचे तरुण नेते लालू प्रसाद यादव,मुलायमसिंग, नितीशकुमार, राम विलास पासवान यांनी मंडलच्या राजकारणानंतर त्या त्या राज्यांवर आपली मांड पक्की केली तर प्रफुल्ल कुमार महंत या विद्यार्थी नेत्यांनी आसाम मध्ये सत्ता हस्तगत केली. या नेत्यांच्या आजच्या राजकारणा बद्दल,त्यांच्या भूमिकेबद्दल मतभेद नक्कीच असू शकतात मात्र त्यांनी त्या दशकात तुरुंग, फावडा आणि मतपेटी या त्रिसूत्रीच्या साहाय्याने पर्याय उभा केला. मग महाराष्ट्राला नामदेव, तुकाराम,शिवाजी महाराज,महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर या पुरोगामी चळवळीचा इतिहास असताना पर्यायी राजकारण का उभे राहत नाही.

संसदीय राजकारण की संसदबाह्य राजकारण असा घोळ घालीत चळवळीची काही वर्षे निघून गेली.नंतर एनजीओच्या चक्रव्यूहात इथली पुरोगामी चळवळ अडकत गेली आणि केवळ ती प्रतिक्रिया देण्यापुरती उरली. महाराष्ट्रातील सरंजामी प्रवृत्तीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुरोगाम्यांना कायम सेना भाजपाची भीती दाखवत वापरून घेतले आणि पुरोगाम्यांनीही स्वतःला वापरू दिले आणि त्यातल्या काही लोकांना त्यांच्या पक्षाच्या दावणीला बांधून टाकले. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या आजच्या नेत्यांच्या यादीकडे एक नजर टाकली तर ते सहकार,शिक्षण किंवा इतर क्षेत्रातील सम्राटच आढळतील. गांधी, नेहरूंच्या नावाने राजकारण करणारी काँग्रेस सामान्य लोकांपासून कधीच तुटली आहे.आणि या सामान्य लोकांशी जोडून घेतले पाहिजे असे कार्यक्रम, आंदोलन करताही आले नाही. असे कार्यक्रम त्यांनी केले की इतक्या वर्षात तुम्ही काय केले या प्रश्‍नाचा पिच्छा त्यांची पाठ सोडत नाही.

महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये सर्वाना बांधून ठेवेल असा चेहरा नाही.कालच्या महाराष्ट्र बंदमुळे प्रकाश आंबेडकर आणि डाव्या संघटनांनी आपली जागा निर्माण केली आहे पण पुन्हा ते प्रतिक्रिया वादी राजकारणात अडकले तर त्यांना त्याचा काहीच फायदा होणार नाही.पुरोगामी चळवळीतील तरुण कार्यकर्ते, नेते यांनी राज्यातील कळीच्या अशा 4-5 प्रश्‍नांवर लढे उभे करण्यासाठी एकत्र यायला हवे. आदिवासी, शेती, स्त्रिया, शिक्षण, असुरक्षित कष्टकरी कामगार, वंचितांच्या प्रश्‍नावर ही मंडळी काम करत आहेत.

महाराष्ट्रात सत्ता मिळवायची असेल तर काँग्रेसने त्यांच्या सरंजामी सम्राटांना बाजूला ठेवून गांधी, नेहरूंच्या स्वप्नातील सामान्य माणसाची लढाई लढणार्‍या डाव्या चळवळीतील लोकांशी जुळवून घ्यावे लागेल आणि डाव्याना ही आता सकारात्मक राजकारण करावे लागेल. काँग्रेसमध्ये न जाताही जिग्नेश मेवाणीने ही वाट दाखवली आहे.

– शरद कदम
अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल,मुंबई
9224576702