धुळे । पा वसाळा सुरु असून पावसामुळे मोठ्या प्रमाणात जलजन्य आजाराची लागण होत आहे. पावसाच्या पाण्यामुळे डबके साचले असल्याने मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. पावसात धुळे शहरात विविध साथीच्या रोगांचा उच्छाद वाढला आहे. त्यामुळेच शहरातील विवीध रूग्णालयांमध्ये साथीच्या विकाराच्या तापाचे अनेक रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच मागील काही वर्षांपुर्वी धुळे शहरातच स्वाईन फ्ल्यू, मलेरीया डेग्यू, हिवतापाने रूग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभुमीवर धुळे शहरातील सध्या बोकाळलेल्या डास व मच्छरांच्या निर्मूलनासाठी धुळे मनपा प्रशासनाने उपाय योजना करावे अशी मागणी आम्ही धुळेकर संघटनेच्या वतीने महानगर पालिकेच्या महापौर कल्पना महाले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सर्वत्र घाणीचे साम्राज्य : धुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य वाढल्याने नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवत आहे. असे असतांना मनपा प्रशासनातर्फे साफसफाईचा कांगावा केला जात आहे. मात्र परिस्थिती वेगळी आहे. शहरातील नागरिकांकडून अस्वच्छतेविषयी तक्रारी करण्यात येत आहे. मनपाच्या व नागरीकांच्या खाजगी मोकळ्या जागेत जागोजागी पाण्याचे डबके तयार झाल्यानें मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे.धुळे शहरातील रमाबाई आंबेडकर नगर, रासकर नगर, रेल्वे स्टेशन परिसर, जमनागिरीचा शनिनगर परिसर, वड्डरवाडा, शहरातील मुस्लिम बहुल परिसर, विवीध परिसरात व शहरातील नदी नाल्यांमध्ये पाणी साचल्याने शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. मनपा प्रशासनाच्या लक्षात आणुन देण्यासाठी शहरातील नागरिकांनी महापौर यांच्याकडे साफसफाई करण्याची मागणी केली.
या आहेत मागण्या
शहरात मोकळ्या भुखंडांवर वाढलेल्या बाभळीचे झुडपे नष्ट करा, फॉगींग मशिनद्वारे फवारणी करा, नदी नाले गटारींची साफसफाई त्वरीत करण्यात यावी, तसेच साथीच्या विकारांच्या निर्मूलनासाठी व शहरातील स्वच्छतेसाठी स्वतंत्र पथक निर्माण करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी आम्ही धुळेकर संघटनेचे धनंजय गाळणकर, इम्रान शेख, किशोर बोरसे, डॉ.श्रीकृष्ण बेडसे, हर्षल शिनकर, नानासाहेब जाधव, सलिम शेख, कमलाकर मोरे, आण्णासाहेब पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.