डास निर्मूलन निधीत मीरा-भायंदर महापालिकेकडून घट

0

मीरा-भायंदर । डासांमुळे उत्पन्न होणार्‍या मलेरिया, चीकनगुनीया, आणि डेंग्यू रुग्णात येत्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. याचे कारण म्हणजे मिरा-भाईंदर महापालिकेने डासांच्या निर्मूलनासाठी खर्च करण्यात येणार्‍या निधीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. याचा परिणाम थेट येथील नागरिकांच्या आरोग्यावर होणार असून ही शहरवासीयांना धोक्याची घंटा मानली जात आहे.

भाजपची एकहाती सत्ता असलेल्या मिरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समितीने डासांचे उच्चाटन करण्यासाठीच्या निधीत 10 कोटीवरून 3 कोटी रुपये म्हणजेच 7 कोटी रुपये कपात केली आहे. डासांचे उत्पत्तिस्थाने नष्ट करण्यासाठी हा निधी वापरला जातो. येत्या काळात बाह्य फवारणी बंद करून डास मारण्यासाठी औषध फवारणी करणार्‍या 180 कंत्राटी कर्मचार्‍यांनाही घरचा रस्ता महापालिकेने दाखविला आहे. निधीच्या कमतरतेमुळे महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. मात्र या निर्णयामुळे आरोग्य यंत्रणा कमजोर होण्याची चिन्हे आहेत.

स्थायी समितीला 3 कोटी रुपयांचा अंदाज
आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार 3 कोटी रुपयांच्या आवश्यक असलेल्या कीटक नाशकाव्यतिरिक्त 6.5 कोटी रुपये मनुष्यबळ, वाहतूक आणि विविध खर्चांकडे जातात. आमच्या प्रकल्पासाठी अंदाजे 10 कोटी रुपये होते, परंतु स्थायी समितीला 3 कोटी रुपयांचा अंदाज आहे. त्यामुळे, आम्हाला सेवा खंडित करायची होती. असे त्यांनी सांगितले. तर स्थानिक नगरसेवक, धृव किशोर पाटील यांनी सांगितले की, निधीचा अभाव असल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे असे म्हणणे चुकीचे आहे. या प्रयत्नासाठी भरपूर प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेली ही सेवा पूर्ववत करण्यासाठी अधिकार्यांना योग्य ते आम्ही निर्देश देणार आहोत.