आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मात्र, महाळुंगे गावच्या हद्दीत हा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. कालव्यातून निघालेले पाणी शेतात गेल्यामुळे शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आंबेगाव तालुक्याला शेती व पिण्याच्या पाण्यासाठी डिंभे धरण वरदान ठरले आहे. या धरणाच्या कालव्यातून संपुर्ण तालुक्याला पाणी पुरविले जाते. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून या कालव्याची दुरुस्ती झालेले नाही. कालव्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे उगवली आहेत. तसेच अनेक ठिकाणी पाण्याची मोठी गळती सुरू आहे. कालव्याच्या गळतीमुळे कालव्यालगत असणारी शेतजमीन नापीक होत चालली आहे. वारंवार तक्रारी करुनही डिंभे धरणाकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरुर तालुक्यातील शेतकरी हैराण झाला आहे. यामुळे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे मोठे संकट बळीराजाच्या डोक्यावर उभे आहे. दरम्यान, महाळुंगे गावाजवळील कालवा फुटल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा मोठा अपव्यय झाला. मात्र, असे असताना प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.