‘डिजिटल इंडिया’त नेटवर्कसाठी केंद्रीय मंत्री झाडावर!

0

बिकानेर । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकार देशाला डिजिटल इंडिया करण्याच्या दृष्टीने अनेक योजना राबवीत आहेत. यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु असतांना देशात शहरांमध्ये विकास होत असताना, अनेक गावांमध्ये अद्याप मोबाईलचे नेटवर्क देखील पोहोचलेले नाही. केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनीच आपल्या सरकारला आरसा दाखवत सत्य परिस्थितीची जाणीव करुन दिली आहे. मोबाईल नेटवर्क मिळवण्यासाठी खुद्द केंद्रीय मंत्र्यांनाच झाडावर चढावे लागले असल्याचा व्हिडियो समोर आला आहे.

रुग्णालयात नर्स नसल्याची तक्रार
सध्या जिकडे तिकडे डिजीटल भारतासंबंधी चर्चा आहे, मात्र सत्य परिस्थिती वेगळंच चित्र दाखवत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल बिकानेर जिल्ह्यातील ढोलिया गावाच्या दौ-यावर आले होते. त्यावेळी तिथल्या समस्या जाणून घेत असतांना लोकांनी रुग्णालयात नर्स नसल्याची तक्रार केली. गावक-यांच्या तक्रारीची दखल घेत तात्काळ कारवाई करण्याच्या उद्देशाने अर्जुनराम मेघवाल यांनी आपला मोबाईल बाहेर काढला. बिकानेरच्या मुख्य आरोग्य अधिका-याशी बातचीत करुन लगेच हा प्रश्न मार्गी लावू असे म्हणत त्यांनी मोबाईल हातात घेतला. मात्र यावेळी त्यांच्या मोबाईलला नेटवर्कच मिळाले नाही.

शिडीवर चढून दिले आदेश
या प्रसंगाने पेच उभा राहिल्यानंतर आता करायचं काय असा प्रश्न उभा राहिला त्यावेळी झाडावर चढल्यावर नेटवर्क मिळू शकते असे गावकर्‍यांनी सांगितले. झाडावर चढायचं कसं ? असा प्रश्न उपस्थित झाल्यावर गावक-यांनी आपली समस्या मार्गी लावायची असल्याने त्यांनी लगेच शिडीची व्यवस्था केली. शेवटी शिडीच्या सहाय्याने मंत्रीसाहेब झाडावर चढले आणि मुख्य आरोग्य अधिका-याशी संवाद साधत लवकराच लवकर रुग्णालयात नर्सची नियुक्ती करण्याचा आदेश दिला.