नागपूर । स्वातंत्र्याला 69 वर्षे पूर्ण झाली तरी अद्यापही ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहोचलेली नाही. लोकांच्या समस्या सोडविण्याचे महत्त्वाचे साधन असलेल्या ग्रामसभेत पारदर्शकतेचा मोठा अभाव आढळून आला. ग्रामसभेतील कारभार अधिकाधिक पारदर्शक व्हावा, यासाठी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने डिजिटल ग्रामसभा सॉफ्टवेअर तयार केले आहे. शहराबरोबर गावाचाही विकास व्हायला हवा, यासाठी ग्रामसभा अधिक प्रभावी होण्याची गरज व्यक्त होत होती. ग्रामसभा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष समस्या सोडविण्याचे साधन बनावे. गावातील प्रत्येक नागरिकांनी आणि ग्रामपंचायतीतील सदस्यांनी ग्रामसभेला गांभीर्याने घेऊन गावाचा विकास करावा, असे अपेक्षित असतानाही अनेक गावांतील चित्र मात्र यापेक्षा वेगळे होते. यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी दिसलेले ग्रामसभेचे भकास चित्र बदलण्यासाठी या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. प्रयत्नांचे फळ म्हणून डिजीटल ग्रामसभा या नावाने सॉफ्टवेअर तयार करण्यात आले.आमदार समीर मेघे यांनी दत्तक घेतलेल्या हिंगणा तालुक्यातील अडेगावात या सॉफ्टवेअरचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी गावचे सरपंच संदीप जैस्वाल उपस्थित होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनाही सॉफ्टवेअरचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी केलेला हा प्रयोग राज्यभर राबविला तर खर्या अर्थाने ग्रामसभा डिजिटल होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
असे काम करते सॉफ्टवेअर
डिजिटल ग्रामसभा हे विंडोबेस्ड सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन आहे. ग्रामसभा सुरुवातीपासून पूर्णत्वास नेण्यासाठी यात एसएमएस विभाग, मीटिंग विभाग, रिपोर्ट विभाग असे तीन विभाग आहेत. ग्रामस्थांची आणि ग्रामसभांच्या पदाधिकार्यांची नोंदणी केली जाते. नोंदणीकृत ग्राहकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व माहिती एसएमएसच्या माध्यमातून दिली जाते.