डिजीटल व्यवहार विषयावर व्यक्त केले मत
पिंपरी : डिजिटल व्यवहार करणे खूप सोपे काम आहे. डिजिटल व्यवहाराविषयी आपला एक समज असतो मात्र, वस्तूस्थिती वेगळी आहे. डिजिटल व्यवहार करण्यासाठी शिक्षणाची गरज नसते. अगदी कमी शिकलेल्या व्यक्ती देखील बहुतांश ठिकाणी डिजिटल व्यवहार करताना दिसतात. त्यामुळे डिजीटल व्यवहार काही अजब आहे. त्यामुळे आपण त्याच्या वाटे जाऊ नये. कोणीही हे व्यवहार करू शकतात, असे उद्गार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी व्यक्त केले.
निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी केंद्रामध्ये स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्यावतीने ‘भीम रुपी महा मुद्रा’ या ‘डिजिटल पेमेंट प्रक्रिया समजून घेण्याचा मार्ग’ या विषयावर चंद्रशेखर ठाकूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीष आफळे, उपाध्यक्ष यशवंत मीठभाकरे, सचिव मिलिंद कुलकर्णी, श्रीकांत दळवी, जनसेवा सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक विलास लांडगे आदी उपस्थित होते.
अनेक लोक कर भरत नाहीत
चंद्रशेखर ठाकूर पुढे म्हणाले की, नोटा मिळत नाही म्हणून डिजिटल व्यवहार करणे चुकीचे आहे. आपल्यातील बरेचसे नागरिक कर भरत नाहीत. नोकरदाराच्या खिशातून कर वसूल केला जातो. मात्र, रस्त्यावर वडापाव किंवा इतर किरकोळ व्यवसायिकांचे उत्पन्न जास्त असले तरी कर भरतातच असे नाही. सरकारकडून जास्ती जास्त नागरिक कर आकरणीच्या जाळ्यात यावेत म्हणून डिजिटल व्यवहारावर भर दिला जात आहे. ज्यामुळे सरकारकडे करोडो रुपयांचा कर जमा होईल आणि त्याद्वारे विकासकामे केली जातील. भीम अॅप वापरताना तीन गोष्टी असाव्या लागतात. त्या म्हणजे बँकेचे खाते, डेबीट कार्ड, मोबाईल आवश्यक आहे. भीम अॅप हे सरकारी अॅप असल्यामुळे विश्वसनीय आहे.
ग्राहकाच्या चुकीमुळे हॅक होते
आपल्यातील बर्याच व्यक्ती फसवणूक होते म्हणून डिजिटल व्यवहार करण्यास घाबरतात. अकाऊंट हॅक होण्याचा प्रकार हा लाखामध्ये एखादा असतो आणि तोही ग्राहकाच्या चुकीमुळे होत असतो. आपल्या अकाउंटची माहिती ही कधीही फोनवर देऊ नये असे वारंवार सांगूनही काही व्यक्ती अशा फसवणार्यांच्या आहारी जातात. जर तुम्हाला अकाउंट हॅक होण्याची किंवा फसवणूक होण्याची तिी वाटत असेल तर व्यक्तीने स्वत:कडे दोन अकाउंट ठेवावीत आणि ज्या बँकेच्या खात्यातून डिजिटल पेमेंट करायचे आहे त्यामध्ये पाच हजाराच्यावर रक्कम ठेऊ नये. अशाप्रकारे आपण डिजिटल व्यवहारही शिकू शिकतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य पंडित तर आभार मिलिंद कुलकर्णी यांनी मानले.